स्मारके देतात हुतात्म्यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:57 AM2017-08-09T00:57:00+5:302017-08-09T00:57:38+5:30

इंग्रजी राजवटीतून देशाची मुक्तता करण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

Memorials give memorials to martyrs | स्मारके देतात हुतात्म्यांच्या आठवणी

स्मारके देतात हुतात्म्यांच्या आठवणी

googlenewsNext
ठळक मुद्देस्वातंत्र्यविरांच्या स्मरणार्थ राज्यात ठिकठिकाणी शहीद स्मारके उभारल्या गेली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : इंग्रजी राजवटीतून देशाची मुक्तता करण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांनी कारावास भोगला. त्या स्वातंत्र्यविरांच्या स्मरणार्थ राज्यात ठिकठिकाणी शहीद स्मारके उभारल्या गेली. ही स्मारकेच हुतात्म्यांच्या आठवणी करून देतात. मात्र दरवर्षी ९ आॅगस्टला औपचारिकता म्हणून या स्मारकांवर येऊन ध्वजारोहण केले जाते. पण या स्मारकांची होत असलेली दुरवस्था पाहिल्यानंतर ते नवीन पिढीला प्रेरणा देण्याऐवजी नवीन पिढीच्या विस्मृतीत जातात की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात तीन ठिकाणी अशा प्रकारचे हुतात्मा स्मारक आहेत. गोंदिया शहरातील सुभाष बगिच्यात सन १९८३ मध्ये हुतात्मा स्मारकाची स्थापना करण्यात आली. या स्मारकात विद्युत व्यवस्था आहे. पंखे लागले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. बागेत असल्यामुळे बगिच्यातील कर्मचारी कधीकधी साफसफाईही करतात. मात्र कोण होते हे हुतात्मे, त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय, याबद्दल विचारले असता तरुण पिढीच काय, मध्यमवयीन नागरिकांकडूनही याचे उत्तर मिळत नाही.
सुभाष बागेत असलेल्या या शहीद स्मारकाच्या सभागृहात ५० लोक बसू शकतात एवढी जागा आहे. दरवर्षी राष्टÑीय सणांच्या काही दिवसांपूर्वी या स्मारकाची व सभागृहाची संपूर्ण स्वच्छता केली जाते. बागेतील कर्मचाºयांची मागणी असल्यास सभागृहाची दुरूस्ती केली जाते. याशिवाय काही तुटफूट झाल्याची माहिती नगर परिषदेच्या बांधकाम विभागाला दिल्यानंतर त्याची सुधारणा केली जाते. एरवी या स्मारकांबद्दल कोणालाही आस्था किंवा आदरभाव दिसून येत नाही.
मागील अनेक वर्षापासून स्मारकाची दुरूस्ती झाली नसल्याने अनेक ठिकाणी स्मारक फुटले आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या परवानगीने लहानसहान विविध कार्यक्रमांसाठी या स्मारकाचा छोटेखानी हॉल मोफत उपलब्ध करून दिला जातो. स्मारकाच्या देखभाल दुरूस्तीसाठी केवळ पाच ते दहा हजार रूपयांचा वार्षिक खर्च येत असला तरीही नगर परिषद त्याकडे दुर्लक्ष करते.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देवून हौतात्म्य पत्करणारे भोला अनंतराम किराड यांच्या स्मृतीचे फलकही गोंदियातील स्मारकावर कोरलेले आहे. याशिवाय बाहेरील स्तंभाजवळील सिमेंटच्या दगडांवर जिल्ह्यातील ७० स्वातंत्र संग्राम सैनिक व शहिदांची नावे कोरलेली आहेत. स्मारकाच्या बाजूलाच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे शहीद चंद्रशेखर आझाद यांचा पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे. त्यालाही खालून भेगा पडत आहेत. येथे आल्यावर हृदय देशभक्तीने भरून, मन भारावून जात असल्याचे चित्र आजघडीला पहायला मिळत नाही.
कोणत्याही शाळेच्या विद्यार्थ्यांना येथे आणून त्या स्मारकाचे महत्व सांगितले जात नाही. असेच चित्र पुढेही कायम राहिल्यास हे स्मारकच काय, हुत्मात्यांची नावेही विस्मृतित गेल्याशिवाय राहणार नाही.
कुºहाडी येथील स्मारकाकडे दुर्लक्ष
गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथे शहीद जान्या-तिम्या या बंधूंच्या बलिदानाची आठवण म्हणून उभारलेल्या हुतात्मा स्मारकाकडेही दुर्लक्षच आहे. या स्मारकाची अवस्था इतकी वाईट आहे की प्रशासकीय यंत्रणेने कित्येक वर्षात त्या ठिकाणी ढुंकूनही पाहिले नसल्याचे लक्षात येते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे या स्मारकाची देखभाल दुरूस्ती आहे. मात्र या विभागाचे अधिकारी असो की जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, त्यांना या हुतात्म्यांच्या स्मृती जपण्याची आस्था दिसून येत नसल्याचेच समजते.

Web Title: Memorials give memorials to martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.