शासकीय धान खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:12 AM2019-01-05T00:12:00+5:302019-01-05T00:12:42+5:30
शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी करण्यासाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी करण्यासाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर शेतकऱ्यांचा कमी आणि व्यापाऱ्यांकडून अधिक धान खरेदी केली जात असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत एकूण शंभर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या खरेदी केंद्रावर नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. केंद्रावर धानाचे दर फलक नाही, किती धान घेतले जाते याचे सुध्दा फलक लावण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांसाठी कुठल्याच सुविधा नाही.
त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याला धानाची विक्री करावी लागत आहे.तर खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने धान खरेदी करुन त्याच धानाची केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी साठगाठ करुन विक्री करीत असल्याची ओरड आहे.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या धानाचा काटा पंधरा पंधरा दिवस होत नसल्याने धान तसाच उघड्यावर पडून आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडून ३ ते ५ किलो प्रती क्विंटल मागे धानाची कट घेतली जात आहे. संपूर्ण धान केंद्रावर सातबाराची पाहणी केली व त्यांची यादी प्रकाशित केली तर अनेक घोळ समोर येईल. याची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याकडे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.