रेल्वेच्या ११ कोटीच्या व्यापारी संकुलाला भाडेकरु मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 08:57 PM2019-04-04T20:57:10+5:302019-04-04T20:59:08+5:30
हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया रेल्वे स्थानकाबाहेर पाच वर्षांपूर्वी ११ कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल तयार करण्यात आले. मात्र भाड्याचे दर अधिक असल्याने मागील पाच वर्षांपासून एकही भाडेकरु न मिळाले हे व्यापारी संकुल धूळ खात पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वेस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया रेल्वे स्थानकाबाहेर पाच वर्षांपूर्वी ११ कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल तयार करण्यात आले. मात्र भाड्याचे दर अधिक असल्याने मागील पाच वर्षांपासून एकही भाडेकरु न मिळाले हे व्यापारी संकुल धूळ खात पडले आहे.
दररोज २० हजार प्रवेश प्रवाशांची ये-जा असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागातील बुकींग आॅफिससमोर अत्याधुनिक व्यापारी संकुल पाच वर्षांपूर्वी रेल्वेने तयार केले होते. रेल्वेच्या रिकाम्या जागेचा उपयोग करुन त्याचा रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र रेल्वे विभागाचे तंत्र चुकल्याने मागील पाच वर्षांपासून उत्पन्न मिळणे तर दूर उलट केलेला खर्च सुध्दा निघाला नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे गोंदिया येथे मोठी बाजारपेठ असल्यानेच या शहराला मिनी मुंबई म्हटले जाते.मात्र रेल्वस्थानकाच्या मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल असताना सुध्दा याला वर्षभरापासून भाडेकरु मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे व्यापारी संकुल भाडेतत्वावर देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर विभागाने यासाठी वांरवार निविदा प्रक्रिया काढली. मात्र यात एकाही व्यापारी पुढे आला नाही. परिणामी मागील पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचे व्यापारी संकुल कुलूप बंद आहे. रेल्वे या व्यापारी संकुलाचे बांधकाम करताना तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने याचा कुठलाच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. तर बिलासपूर मुख्यालयातून व्यापारी संकुलाची वांरवार निविदा काढण्यात आली. यासाठी व्यापाऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाले. तर ज्या ठिकाणी हे व्यापारीे संकुल तयार करण्यात आले आहे त्या ठिकाणी व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता कमी असल्याने व्यापारी पुढे येत नसल्याचे बोलल्या जाते. परिणामी मागील पाच वर्षांपासून व्यापारी संकुल केवळ धूळखात व कुलूप बंद पडले आहे.
आता नागपूर विभाग काढणार निविदा
गोंदिया येथील व्यापारी संकुल भाडेतत्त्वावर देण्यासाठी पूर्वी बिलासपूृर मुख्यालयाने ३९ लाख रुपयांची निविदा काढली होती. मात्र याला प्रतिसाद न मिळाल्याने आता ही निविदा काढण्याची जबाबदारी नागपूर मंडळावर सोपविण्यात आली आहे. यात निविदेची किमंत पूर्वी पेक्षा कमी करुन २५ लाख रुपये करण्यात आली आहे.
व्यापारी संकुलाच्या मोकळ्या जागेचा वापर करा
रेल्वे विभागाने ज्या ठिकाणी व्यापारी संकुल तयार केले आहे त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा आहे. मात्र त्या जागेचा अद्यापही कुठल्याचा कामासाठी वापर करण्यात आला नाही. त्यामुळे या परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. त्यामुळे रेल्वे विभागाने या खाली जागेचा वापर योग्य कामासाठी केल्यास यातून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.