जिल्ह्याचा पारा पुन्हा ४३ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:35 PM2019-05-17T21:35:23+5:302019-05-17T21:36:02+5:30
उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ झाली असून त्याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
एप्रिल महिन्यातच तापमान चांगले भडकल्याचे दिसले.मात्र उन्हाळ््याचा खरा रंग मे महिन्यात चढत आहे. त्यानुसार, सूर्यदेव चांगलेच भडकले असून उन्हाची तिव्रता वाढतच आहे.
मध्यंतरीचे काही दिवस तापमानात घट दिसून आली होती. अशात गुरूवारी (दि.१६) पुन्हा तापमान ४३.५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. रखरखत्या उन्हामुळे सकाळी ८-९ वाजतापासूनच अंगाला चटके लागत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. मे महिना आता अर्ध्यात आला असून पुढचा जून महिनाही उरलेला असल्याने उन्हाची तिव्रता बघून भल्याभल्यांना धडकी भरली आहे.
पारा चढतच जात असल्याने उरलेले दिवस कसे जातील याचा विचार करूनच घाम फुटत आहे.उन्हाच्या तिव्रतेमुळे लोकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आहे.
दुपारची कामे नागरिकांकडून टाळली जात असून सायंकाळी ते घराबाहेर निघत आहेत. मात्र लग्नसराई असल्यामुळे मन मारून घराबाहेर निघणारेच दिसत आहेत.
आणखी १५ दिवस राहणार होरपळ
उन्हाने जिल्ह्याला चांगलेच होरपळून सोडले असतानाच आणखी १५ दिवस तरी या उष्ण लहरींपासून सुटका नसल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने विदर्भात १५ दिवस होरपळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पूर्ण मे महिनाच जिल्हावासीयांना आगीच्या भट्टीत काढावा लागणार असल्याचे दिसते. असह्य झालेल्या या उन्हापासून कधी सुटका मिळते याचीच सर्व वाट बघत आहेत.
लग्न सराईलाही उन्हाचे चटके
उन्हाचा पारा चढत चालला असताना लग्नसराई मात्र कमी होत असल्याचे दिसत नाही. सकाळपासूनच लग्नाची वाजंत्री वाजत असून रात्रीही मोठ्या प्रमाणात लग्न आटोपले जात आहेत. यात मात्र दिवसाच्या लग्नात वºहाडी व नागरिकांची फजीती होत आहे. रखरखत्या उन्हामुळे घामाघूम होत लग्न आटोपले जात आहेत. रात्रीही तेच हाल असून उपाय नसल्याने, आहे त्या स्थितीत लग्न सोहळे सुरूच आहेत. यात मात्र वृद्ध व लहानग्यांची चांगलीच फजीती होत आहे.