पारा गेला चाळीशी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:12 AM2018-04-30T00:12:25+5:302018-04-30T00:12:25+5:30
एप्रिल महिन्यातच रविराज चांगलेच तळपू लागले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्ह्यालाच भाजून सोडले आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एप्रिल महिन्यातच रविराज चांगलेच तळपू लागले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्ह्यालाच भाजून सोडले आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल महिन्यापासून उन्हाळा खऱ्या अर्थाने रंगात येतो असा आजवरचा अनुभव आहे. तर मे महिन्यात उन्हाळा भाजून सोडतो असे आतापर्यंत बघावयास मिळाले आहे. त्यामुळे नागरिक मे महिन्यात दुपारच्या वेळेत घराबाहेर निघण्याचे टाळत असून तेव्हाच रस्ते शुकशुकाट दिसतात. यंदा मात्र वातावरण चांगलेच बदलले असून यंदा एप्रिल महिन्यातच रविराज डोळे वटारून आपला रंग दाखवू लागले आहेत. यामुळेच आतापासूनच ४० डिग्रीच्यावर तापमानाची नोंद घेतली जात आहे. या उष्णलहरीमुळे शहरातील रस्ते आतापासूनच ओस पडत आहेत.
जेमतेम एप्रिल महिन्याचा शेवट असताना उन्हाचा उद्रेक बघता येणाºया मे व जून महिन्यात काय कहर होणार याचा विचार करूनच अंगाला घाम फुटत आहे. यंदाच्या उन्हाने नागरिकांच्या अंगाची आतापासूनच लाही-लाही होत आहे. एवढेच नव्हे तर पंखे व कुलर आतापासूनच फेल ठरत आहेत. अवघ्या राज्याची ही स्थिती असून काय करावे असा सवाल सर्वांपुढे उभा आहे. मात्र घरात बसून कामे होणार नाहीत. यामुळे बांधून-बुंधून नागरिक घराबाहेर पडत आहेत. तरिही उन्हात निघणे टाळले जात असल्याची जाणीव रस्त्यांवरील शुकशुकाट करून देत आहे. विशेष म्हणजे, या उष्ण लहरीची दखल घेत आरोग्य विभागाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पूर्वी मे महिन्यातील उन्हामुळे नागरिकांना त्रास जाणवत होता. यंदा मात्र उन्हाची तिरीप एवढी वाढली आहे की, मे महिन्यातील आग सुर्यदेव आताच ओकत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आतापासूनच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
तापमान मापकाची व्यवस्थाच नाही
काही वर्षांपूर्वी येथील जुन्या तहसील कार्यालयात तापमान मापक यंत्र होते व तहसील कार्यालयातील संबंधीत कर्मचाºयांकडून तापमानाची नोंद दररोज मिळत होती. शिवाय तहसील कार्यालयात एक चार्ट लावले जात होते व त्यावर दररोजची नोंद केली जात होती. अशात कुणालाही तेथून तापमान कळत होते. आता मात्र मागील काही वर्षांपासून ही व्यवस्था फिस्कटली आहे. शिवाय सध्या तरी तहसील कार्यालयाकडे तशी काहीच व्यवस्था नसल्याचेही कळले. त्यामुळे आजघडीला फक्त बिरसी विमानतळ येथेच तापमान मापक यंत्र असल्याची माहिती आहे.