महिलांना मायक्रो एटीएम वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 09:50 PM2018-01-04T21:50:54+5:302018-01-04T21:51:11+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे बुधवारी (दि.३) नेहरु चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. यात बचत गटातील महिलांना मायक्रो एटीएम वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे बुधवारी (दि.३) नेहरु चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. यात बचत गटातील महिलांना मायक्रो एटीएम वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, नागपूर विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक नीरज जागरे, समाज कल्याणचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त अनिल देशमुख, माजी सभापती सविता पुराम, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी काळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. बचतगटाच्या माध्यमातून माविम मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणावर सातत्याने भर देत आहे. जिल्ह्यातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणात सावित्रीबाई फुलेंचा मोलाचा वाटा आहे. महिला त्यांच्या आदर्शावरच वाटचाल करून स्वावलंबी बनत आहेत, असे सांगितले. दयानिधी म्हणाले, महिलांनी सर्वांगिण विकासासाठी संघटीत होवून काम करावे. सामाजिक विकासात महिलांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आज सक्षम होत असल्याचे सांगितले. डॉ. भूजबळ म्हणाले, महिलांना सामाजिक सुरक्षा पोलीस विभागामार्फत पुरवून कायदेशीर मदत दिली जाईल. जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांचे चांगले संघटन असून अनेक महिला आज उद्योग-व्यवसाय करीत असल्याचे सांगितले.
माविमच्या बचतगटातील महिला तसेच शहरातील महिला व युवतींच्या मोटरसायकल रॅलीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरु न फिरु न नेहरु चौकात विसर्जित झाली. या रॅलीमध्ये ई-व्हेईकलचा सुध्दा समावेश होता. रॅलीतील आकर्षक चित्ररथात सावित्रीबाईच्या वेशभुषेत अनिता बडगे होत्या.
प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी मांडले. संचालन शालू साखरे यांनी केले. आभार प्रिया बेलेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहायक जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश मार्कंड, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक नियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर, धनराज बनकर, मोनिता चौधरी, आशीष बारापात्रे यांनी सहकार्य केले.
२४ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी बचतगटातील तुलशी चौधरी, भीमा पटले, शाहिस्ता शेख, अनिता चिखलोंडे, दुर्गा रंगारी, शोभा तावाडे, सुनिता शिवणकर, सत्यशीला भगत या ८ महिलांना मायक्रो एटीएमचे वाटप करण्यात आले. उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदिया व स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगाव यांना आर्थिक मध्यस्थता उपक्र माकरिता प्रत्येकी २४ लाख रु पयांचे धनादेश देण्यात आले.