ग्रामपंचायतीच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:42 PM2018-03-04T21:42:51+5:302018-03-04T21:42:51+5:30
प्रत्येक गावातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीसह मानसिकताही वेगळी आहे. नियोजनाशिवाय उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड जाणार आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : प्रत्येक गावातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीसह मानसिकताही वेगळी आहे. नियोजनाशिवाय उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड जाणार आहे. शौचालय केवळ एका व्यक्तीसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. उद्दिष्टपूर्तिसाठी ग्रामपंचायतीच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
तिरोडा पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवकांचा आढवा घेताना ते बोलत होते.
या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.डी. मुंडे, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जावेद इनामदार, सहायक गटविकास अधिकारी आर.के. दुबे उपस्थित होते.
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत गुडमॉर्निंग पथकाचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे. त्याबद्दल प्रसंशोद्गार काढून वैयक्तीक शौचालय, नादुरुस्त शौचालय, शेअरिंग शौचालयांचा ग्रामपंचायतनिहाय आढावा घेण्यात आला. यासोबतच पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजनेचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देवून नरेगा व करवसुलींचा देखील याप्रसंगी आढावा घेण्यात आला.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी वैयक्तिक शौचालय बांधण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, ग्रामपंचायतीसाठी जिल्हा ग्राम विकास निधी असतो. त्यातून लाभार्थ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देता येवू शकते. यासोबतच महिला बचत गटातून सुद्धा कर्ज घेवून लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तसेच संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती देवून हागणदारीमुक्तीचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे मत गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी व्यक्त केले.
आढावा बैठकीत नादुरूत व शेअरिंग शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासह स्वच्छतेच्या बाबतीत उत्कृष्ट कार्य करण्यासाठी ग्रामपंचायतचे संपूर्ण अधिकारी आर.टी. निखारे, जी.एम. भायदे, सी.एच. गौतम, आर.जे. बन्सोड यांचा तसेच ग्रामपंचायत चोरखमारा, सर्रा, मारेगाव, नवरगाव, नवेझरी, कुल्पा, बिहिरीया, कवलेवाडा, पालडोंगरी, अर्जुनी, खुरखुडी, पांजरा, सुकळी, मरारटोला, पुजारीटोला, ठाणेगाव, बेरडीपार खु., बोरगाव येथील ग्रामसेवकांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. सोबतच स्वच्छ भारत मिशनचे गटसमन्वयक संजय राठोड, समूह समन्वयक छाया बोरकर, सुरेश पटले, अनूप रंगारी यांचे सुदधा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उत्कृष्ट कार्यासाठी कौतुक केले.
स्वच्छतादूताचा सत्कार
ग्रामपंचायत स्तरावर गुडमॉर्निंग पथक राबविण्यात हिरहिरीने सहभाग घेवून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी चिरेखनी येथील युवक कार्तिक बिसेन उत्कृष्ट कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांचा स्वच्छतादूत म्हणून प्रशस्तीपत्र देवून विशेष सत्कार करण्यात आला.