रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 05:19 PM2024-05-20T17:19:13+5:302024-05-20T17:19:41+5:30
पोटासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी: उद्योग आल्यास भटकंती थांबणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे मनरेगाची कामेसुद्धा सुरू झाली नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजूरवर्ग जिल्ह्याबाहेर व परराज्यात स्थलांतरण करीत असल्याचे चित्र आहे. अनेक गावांमध्ये रोजगाराचे पुरेसे साधन नाही, नैसर्गिक हवामानाचे ऋतू बदलतात, तसा मजुरांनासुद्धा रोजगार शोधावा लागतो. उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मिळते.
त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास थोडाफार आधार मिळतो. दरवर्षी मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतात त्यामुळे मजुरांना गाव परिसरातच रोजगार उपलब्ध होतो. मात्र यंदा प्रशासनाने मनरेगाच्या कामाचे नियोजन निवडणूक आचारसंहितेपूर्वी न केल्याने मागील महिनाभरापासून मजुरांच्या हाताला काम नाही.
जिल्ह्यातील मजूर दरवर्षी सोयाबीन कापणी, कापूस वेचणीच्या कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात. रोवणी करायला महिला मजूर जातात. तर आंध्रप्रदेशात मिरची तोडणीसाठी दरवर्षी जिल्ह्यातील मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात जात असतो. या ठिकाणी त्यांना जवळपास दोन महिने रोजगार प्राप्त होतो.
यामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास थोडीफार मदत होते. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम असतो. यासाठीसुद्धा मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेर जातात. सडक-अर्जुनी तालुक्यासह इतरही तालुक्यातील मजूरवर्ग सध्या तेंदूपत्ता तोडणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याचे चित्र आहे.
रोजगार उपलब्ध करावा
■ गोंदिया जिल्ह्यात उद्योगांचा अभाव असल्याने शेती शिवाय मजुरांना दुसरे काम नाही. त्यामुळे कृषीवर आधारित रोजगार उपलब्ध झाल्यास मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागणार नाही. स्थानिक लोक- प्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अनेक गावात रोजगार हमी बंदच
■ यावर्षी परिसरातील अनेक गावात रोजगार हमीच्या कामांचा नारळ फुटलाच नाही. रोजगार सेवक तसेच पंचायत समितींनी कामाचा आढावा घेतला नाही, कामे काढलेच नाही. परिणामी मजुरांच्या हाताला काम नसल्याने मजुरांचे स्थलांतरण होत आहे.