भातावर लष्करी अळीचे आक्रमण
By admin | Published: August 21, 2016 12:13 AM2016-08-21T00:13:23+5:302016-08-21T00:13:23+5:30
भात पिकांवर आॅगस्टमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणाचा परिणाम : नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या उपाययोजना
गोंदिया : भात पिकांवर आॅगस्टमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी शेताचे नियमीत सर्व्हेक्षण करून प्रादुर्भाव आढळून आल्यास या किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पावसाचा दीर्घ उघाड व बांधीत पाणी नसल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. हया अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करून शेत फस्त करतात. अळ्या रात्री कार्यक्षम असून दिवसा धानाच्या बोचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. अळ्या पानाच्या काठावरुन कुरतडतात त्यामुळे धानाचे पीक निष्पर्ण होते. पीक लोंबी अवस्थेत असतांना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरतडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला दिसतो. प्रती चौरस मीटर मध्ये चार ते पाच अळ्या दिसून आल्यास शेतकऱ्यांनी उपाय करावे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास संबंधित गावातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले आहे.
सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यात भात पिकांवर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळूून आला आहे. अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करून शेत फस्त करतात. अळ्या रात्री धुऱ्यावरील गवतात लपून बसतात. औषधी पाण्यात मिसळून फवारणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पेशट्टीवार यांनी केले आहे.
तिरोडा : वातावरणातील आर्द्रता व खंडीत पाऊस यामुळे किड व रोग प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. काही भागात अल्प प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. भात पिकावर जुलै व आॅगस्टमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
या किडीचा ओळख अळीचा पतंग मध्यम आकाराचा १-२ सेमी लांब असून समोरील पंख गडद पिंगट व त्यावर काळसर ठिपका आणि कडेवर नागमोडी पट्टे असतात. पुर्ण वाढलेली अळी २.५-४ सेमी लांब मठ्ठ मऊ हिरवी काळी आणि अंगावर लाल पिवळसर उभ्या रेषा असतात. मादी २००-३०० अंडी समूहाने पुंजक्याच्या स्वरूपात धानावर/गवतावर घालते. अंडी करड्या रंगाच्या केसानी झाकलेली असतात, अंडी अवस्था ५ ते ८ दिवस, अळी अवस्था २०-२५ दिवस व कोषा अवस्था १० ते १५ दिवसाची असते. कोष धानाच्या बुंध्या जवळील बेचक्यात/जमिनीत आढळतात. लष्करी अळीची एक पिढी पुर्ण होण्यास ३०-४० दिवस लागतात. या अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करतात व शेत फस्त करतात. अळ्या रात्री कार्यक्षम असून दिवसा धानाच्या बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. सर्व ग्रामपंचायत कार्यालयात नोटीस बोर्डवर किड व रोगाचा संदेश लावण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी शेताचे नियमित सर्व्हेक्षण करून प्रादुर्भाव आढळुन आल्यास लष्करी अळीचा बंदोबस्त करावा, असे तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांनी केले आहे.