कोट्यवधींचे ऑटो टिप्पर धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:25+5:30
शहरातील कचऱ्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार ही शहराची स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे, यात ओला व सुका कचरा याच्या वर्गीकरणाबाबत अद्यापही शहरवासीयांत जागृती निर्माण झालेली नाही. मात्र या गलिच्छ वातावरणाचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात निघणाऱ्या कचऱ्याचे नियमित संकलन व्हावे व त्यातही ओला-सुका कचरा वर्गीकृत करून संकलित करता यावा यासाठी नगर परिषदेने ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले आहेत. सुमारे एक कोटींपेक्षा जास्त या ऑटो टिप्परसाठी नगर परिषदेने चालक व हमाल पुरवठासाठी निविदा टाकली आहे. आता याला महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असून निविदा उघडण्यात आलेली नाही. परिणामी कोट्यवधींचे हे ऑटो टिप्पर धूळखात पडून आहेत.
शहरातील कचऱ्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार ही शहराची स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे, यात ओला व सुका कचरा याच्या वर्गीकरणाबाबत अद्यापही शहरवासीयांत जागृती निर्माण झालेली नाही. मात्र या गलिच्छ वातावरणाचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. अस्वच्छतेच्या वातावरणात शहरवासीयांना श्वास घ्यावा लागत आहे. यावर शासनाकडून नगर परिषदेला ऑटो टिप्पर खरेदीबाबतचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार, नगर परिषदेने ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले आहेत. या ऑटो टिप्परमध्ये ओला व सुका कचºयाकरिता वेगवेगळे खाणे असून प्रत्येकी एक टिप्परनुसार २१ टिप्पर लावले जाणार आहेत. तर उर्वरीत १२ टिप्पर नगर परिषदेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पात लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यातील ११ टिप्पर १६ जुलै रोजी नगर परिषदेत दाखल झाले होते. त्यानंतर उर्वरीत २२ टिप्पर काही दिवसांनी आले होते. हे ऑटो टिप्पर चालविण्यासाठी नगर परिषदेने ३३ चालक व ३३ हमालांसाठी निविदा काढली. आता त्याला महिनाभरापेक्षा जास्तीचा कालावधी लोटला आहे. मात्र निविदा उघडण्यात आली नसल्याने हे ३३ ऑटो टिप्पर नगर परिषद कार्यालयाच्या आवारात धूळखात पडून आहेत.
नगर परिषदेकडून शहर स्वच्छता विषयक काही नवोपक्रम राबविले जात नाही. त्याता आता शासनाने मदतीचा हात म्हणून वाहनांची सोय करून दिली. यातही नगर परिषद प्रशासनाची उदासिनता आड येत आहे. महिनाभरापेक्षा जास्तीचा कालावधी लोटल्यानंतरही निविदा उघडण्याची सवड नसल्याने नगर परिषद आपल्या जबाबदारीप्रती किती जागरूक आहे याची प्रचिती येते.
निविदा प्रक्रियेबाबत तर्क-वितर्क
३३ चालक व ३३ हमालांसाठी नगर परिषदेने चक्क २.९० कोटींची निविदा टाकली आहे. आता महिनाभर होऊनही ही निविदा उघडण्यात आलेली नाही.नेमक्या याच विषयाला घेऊन प्रतिनिधीने नगर परिषद अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उद्याच निविदा उघडणार असल्याचे सांगत आपली बाजू स्पष्ट करून टाकली. विशेष म्हणजे, या निविदेला घेऊन नगर परिषदेत तर्क वितर्कही लावले जात आहे. हे काम पुन्हा एका विशेष एजंसीच्या हाती दिले जाते काय हे आता बघायचे आहे. तसेही नगर परिषद प्रशासन एका एजन्सीवर जास्त मेहरबान असल्याने शंका व्यक्त केली जात आहे.