कोंबडा बाजारात लाखोंचा जुगार
By Admin | Published: September 17, 2016 02:12 AM2016-09-17T02:12:31+5:302016-09-17T02:12:31+5:30
देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कन्हारपायली व पातरगोस्वाच्या मध्ये २६ आॅगस्टपासून कोंबडा बाजार व जुगार सुरू आहे.
गावकऱ्यांची ओरड : पोलीस प्रशासन सुस्त
शेंडा (कोयलारी) : देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कन्हारपायली व पातरगोस्वाच्या मध्ये २६ आॅगस्टपासून कोंबडा बाजार व जुगार सुरू आहे. तरीही पोलीस प्रशासन कोणत्याच प्रकारची दखल घेत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.
कोंबड्याची झूंज लावणे व त्यावर शर्यत लावून जुगार खेळणे कायद्याने गुन्हा आहे. जवळच असलेल्या कन्हारपायली व पातरगोट्याच्या मधात हा गोरखधंदा २६ आॅगस्टपासून सुरू असून आठवड्यातून रविवार व बुधवारलाच भरविला जातो. मात्र अद्यापही पोलिसांकडून या अवैध धंद्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष.
प्राप्त माहितीनुसार, सडक अर्जुनी येथील एक व्यक्ती हा कोंबडा बाजार भरवतो. यामधून त्याला दिवसाकाठी १५ ते २० हजार रुपये कमिशन पोटी मिळत असल्याचा अंदाज आहे. या कोंबडा बाजारात भाग घेण्यासाठी गोंदिया, तुमसर, भंडारा व छत्तीसगड यासारख्या भागातून लोक दुचाकी व चारचाकी वाहनांनी येतात. ज्या ठिकाणी कोंबड्यांची झूंज लागते. त्यांच्या शेजारीच जुगार खेळणाऱ्यांचा जत्था असतो. त्यामध्ये लाखोची उलाढाल होत असते. हा कोंबडा बाजार बघण्यासाठी जवळपासच्या लोकांची गर्दी जमली असते. त्यामधील काही युवकांची मनस्थिती विचलित होवून तेसुद्धा या गोरखधंद्याला बळी पडले आहेत.
सदर बाजारात कोंबड्याच्या एका पायाला तिक्ष्ण अवजार बंधून पैज लढविली जाते. त्यामुळे जीवित हानी होवू शकते, हे विसरुन चालणार नाही. त्याचप्रमाणे खेड्यापाड्यातील युवक व विद्यार्थी या वाम मार्गाकडे वळण्याची दाट शक्यता आहे. कोंबडा बाजार कायमचा बंद व्हावा, यासाठी तंटामुक्त गाव समितीकडे तक्रारही करण्यात आली. मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस पाटलांना माहिती असूनही ते पोलिसांपासून का दडवतात? हे न उलगडणारे कोडे आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष पुरवून तात्काळ कोंबडा बाजार व जुगार अड्डा बंद करावा, अशी मागणी सुरजलाल उईके, मंगेश लोणारे व नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)