ऑनलाईन गेमिंगचा विळखा; मानसिक तणावातून तरुणाने संपवले जीवन

By नरेश रहिले | Published: September 2, 2023 03:31 PM2023-09-02T15:31:51+5:302023-09-02T15:34:49+5:30

आईच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल: ऑनलाईन जुगार उठू लागले जीवावर

Millions of rupees lost in online gaming, gambling; young man commits suicide due to mental stress | ऑनलाईन गेमिंगचा विळखा; मानसिक तणावातून तरुणाने संपवले जीवन

ऑनलाईन गेमिंगचा विळखा; मानसिक तणावातून तरुणाने संपवले जीवन

googlenewsNext

गोंदिया : ऑनलाईन जुगारामुळे लाखो रूपये गमावले अन् लाखो रूपयाची अंगावर उधारी झाली. परंतु पैसे येत नसल्याचे पाहून मानसिक तणावात असलेल्या तरूणाने एकांतवास पाहून स्वत:च्या घरी २८ जुलै २०२३ रोजी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बब्बा भवन, चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया येथे घडली. त्या तरूणाला ऑनलाईन गेम खेळवून त्याची लाखो रूपयाने फसवणूक करणाऱ्या गोंदियातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरज अशोककुमार मानकानी रा. बब्बा भवन, चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.

आई ममता अशोककुमार मानकानी (५४) यांनी गोंदिया शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ते दोघेच मायलेक घरी राहात होते. २६ जुलै रोजी ममता मानकांनी यांची मावस बहिणीची तेरवी असल्याने ती नागपूरला गेली होती. मुलगा निरज एकटाच घरी होता. त्याच दिवशी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गोंदियातील अनिल ककवाणी यांच्या आईने फोन निरजने आत्महत्या केल्याची माहिती ममता यांना दिली. त्यांनी लगेच गोंदिया करीता कोरबा या रेल्वेने निघाल्या. रात्री ९:४५ वाजता त्या गोंदियात परतल्या.

निरज हा मार्च २०२२ पासून २८ जुलै २०२३ रोजीपर्यंत ऑनलाईन पैशांवर खेळविल्या जाणाऱ्या गेमिंग व बेटींगचा ऑनलाईन जुगार खेळत होता. गोंदियातील चिराग फुंडे रा. सिव्हिल लाईन, गोंदिया व अभिजीत रा. सेल्सटॅक्स कॉलनी, गोंदिया यांच्याकडे तो ऑनलाईन बेटींग खेळत असायचा. चिराग फुंडे व अभिजित यांनी निरजला खेळण्यास लावलेल्या जुगारामध्ये निरज लाखो रूपये हारला होता. निरज जुगारामध्ये कधी पैसे जिंकायचा तर कधी हारायचा. परंतु मागील काही दिवसांमध्ये तो जुगारामध्ये लाखो रूपये हारलेला होता.

जुगारामध्ये तो मोठया प्रमाणात रूपये हारल्याने आरोपी त्याच्याकडे वारंवार पैश्यांची मागणी करून तगादा लावत असत. या जाचाला कंटाळून त्याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेसंदर्भात आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.

निरज खेळत होता तीन प्रकारचे गेम

निरज हा गजानन ॲप, महादेव ॲप, रेड्डी ॲपवर ऑन लाईन गेमिंग व बेटींग खेळत असायचा. निरज ऑनलाईन जुगारामध्ये लाखो रूपये हारल्याने तसेच निरज बरोबर ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्यांनी आर्थिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने फसवणुक केल्याने त्याला आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले.

निरजच्या मित्रांनी दिली आईला माहिती

निरज ऑनलाईन जुगारामध्ये लाखो हारला. निरज बरोबर ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्यांनी आर्थिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने फसवणूक करून आत्महत्या करण्यास भाग पाडले. निरजने खेळलेल्या जुगारामुळेच त्याला आत्महत्येची पाळी आली असे त्याच्या मित्रांनी त्याच्या आईला सांगितले. तब्बल सात मित्रांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसात तक्रार करण्यात आली.

ऑनलाईन गेमींगचे धागेदोरे तपासणे गरजेचे

ऑनलाईन गेम खेळविणाऱ्या गोंदियातील एकामुळे नागपूरच्या तरूणाने आत्महत्येचे पाऊल उचलले होते. आता गोंदियातील तरूणाने ऑनलाईन गेमींगमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ऑनलाईन गेमींगचे जाळे तरूणांना गर्ततेच्या जाळ्यात अडकविणारे आहे. याचे धागेदोरे तपासणी आवश्यक आहे. ऑनलाईन गेमींग जीवावर उठले आहे.

Web Title: Millions of rupees lost in online gaming, gambling; young man commits suicide due to mental stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.