लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्र्यांचाच आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:04+5:302021-02-23T04:45:04+5:30
सालेकसा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. परिणामी लाखो ...
सालेकसा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. परिणामी लाखो क्विंटल धान उघड्यावरच पडून आहे. शासन आणि राईस मिलर्स यांच्यात अद्यापही तोडगा न निघाल्याने याचा परिणाम शासकीय धान खरेदीवर होत आहे. धान खरेदी खोळंबण्याच्या मार्गावर असून लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्र्यांचाच आधार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात पावसाने दगा दिला. आधीच कोरोनामुळे आलेल्या संकटाने शेतकरी वर्ग खचला असताना दुबार पेरणीचे संकट ओढवले. दीड महिना पाऊस उशिरा झाला. त्यानंतर सातत्याने पाऊस झाला. धान कापणीवर आला असतानादेखील पाऊस झाला. त्यामुळे धान पिकावर कीड रोगांनी आक्रमण केले. हलक्या धानाचे उत्पादन बंपर झाले. मात्र भारी धानाला कीड रोग आणि वातावरणाचा फटका बसला. अर्ध्यापेक्षाही कमी उत्पादन झाले. आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने उधार-उसनवारी फेडण्याकरिता शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर धान विक्रीकरिता गर्दी केली. चार ते पाच दिवस रांगेत उभे राहून धानाची विक्री केली. दरवर्षी खरेदी सुरू असतानाच भरडाईकरिता धानाची उचल करण्यात येते. परंतु,चालू हंगामात राईस मिलर्स आणि शासन यांच्यात वाद असल्यामुळे अद्याप धानाची उचल झाली नाही. परिणामी तालुक्यातील कोटरा, बिजेपार, लोहारा, सालेकसा, साखरीटोला, दरेकसा, गोर्रे, पिपरिया, कोटजंभुरा येथील गोदाम फुल्ल झाले. आज, ना उद्या धानाची उचल होईल म्हणून संस्था चालकांनीदेखील खरेदी सुरू ठेवली. गोदामांच्या बाहेर हजारो क्विंटल धान उघड्यावर आहे. सध्या अवकाळी पाऊस पडत असून त्याचा फटका खरेदी केलेल्या धानाला बसत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.....
ताडपत्री पुरविण्याकडेही दुर्लक्ष
सालेकसा, आमगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव या तालुक्यांत आदिवासी विकास महामंडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत हमीभाव धान खरेदी केंद्र करते. धानाची भरडाईकरिता उचल करण्यात यावी असे पत्र संस्थांनी आदिवासी विकास महामंडळाला दिले. धान उघड्यावर असल्यामुळे त्याच्यावर झाकण्याकरिता ताडपत्री पुरविण्यात यावी, अशी मागणीदेखील केली होती. मात्र अद्यापही ताडपत्रीदेखील पुरविण्यात आली नाही. अवकाळी पाऊस झाल्यास लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.