पाणीटंचाईच्या नावाखाली लाखो रूपये खर्च
By admin | Published: June 3, 2017 12:08 AM2017-06-03T00:08:59+5:302017-06-03T00:08:59+5:30
सडक-अर्जुनी येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांनी पाणी टंचाईच्या नावावर करारनामे न करता लाखो रूपये खर्च केले आहेत.
मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा: ११ नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांनी पाणी टंचाईच्या नावावर करारनामे न करता लाखो रूपये खर्च केले आहेत. या संदर्भात कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ११ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सडक-अर्जुनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी नियमबाह्य कामे करीत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. करारनामे न करता दोन खासगी विंधन विहीरींवर मोटारपंप बसविले आहे. नगर पंचायतकडे करारनामे नसल्यामुळे ज्या विंधन विहीरीवर मोटारपंप नगरपंचायतच्या माध्यमातून बसविण्यात आले. त्या पाण्याचा पुरवठा नगर पंचायतला करण्यास विंधन विहीर मालकाने बंद केला. योजनाबध्दरित्या पंप आॅपरेटरला १५ दिवसाच्या सुट्टीवर पाठविण्यात आले. यामुळे पाण्यासाठी नागरिकांनी नगरसेवकांच्या नावाने खळे मोडले.
नगर पंचायतच्या कामाकरीता एका कर्मचाऱ्याला रात्री १०.३० वाजता महिला नगरसेवकाच्या घरी पाठविले, हे कोणत्याच कायद्यात बसत नसताना हे काम या ठिकाणी होत आहे. तिव्र पाणी टंचाई पाहता सभापती मुख्याधिकाऱ्यांना फोन करून नविन मोटारपंपासंदर्भात विचारणा केली असता मुख्याधिकारी त्यांच्याशी उध्दट शब्दात बोलत नविन मोटारपंप घेऊ नका मी बील काढणार नाही असे मुख्याधिकारी म्हणतात. जूने कामाचे आदेश दिले ते मी रद्द करीत आहे.
नगर पंचायतीने जानेवारी २०१६ पासून जे-जे ठराव पारीत केले ते आता जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवा अशी विनंती करूनही ते ठराव पाठवत नाही. असे अनेक नियमबाह्य कामे करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते देवचंद तरोणे, पाणी पुरवठा सभापती ज्योती गिऱ्हेपुंजे, नगरसेवक अभय राऊत, रेहान शेख, भाजपचे गटनेते दिनेश अग्रवाल, नगरसेवक तारा मडावी, जिजा पटोले, प्रियंक उजवने, कविता पात्रे, चंद्रप्रभा मुनिश्वर, स्वीकृत सदस्य मोहनकुमार शर्मा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.