एमआयएम ‘सुपारी किलर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2016 02:27 AM2016-01-13T02:27:52+5:302016-01-13T02:27:52+5:30
खासदार ओवेसी यांचा ‘एमआयएम’ हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आपले पाय पसरू पाहात आहे.
भाजपचा आरोप : अल्पसंख्यक आघाडी सक्रिय
गोंदिया : खासदार ओवेसी यांचा ‘एमआयएम’ हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आपले पाय पसरू पाहात आहे. मात्र हा पक्ष ‘सुपारी किलर’ असल्याचा आणि समाजाच्या नावावर खिसे भरण्याचे काम करणारा पक्ष असल्याचा घणाघात भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी केला.
गोंदियात पत्रकारांशी बोलताना सिद्धीकी यांनी आता भाजपची अल्पसंख्यक आघाडी प्रत्येक जिल्ह्यात जास्त सक्रियपणे काम करणार असून त्यासाठी येणाऱ्या महानगर पालिका, नगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम उमेदवारांना योग्य प्रतिनिधीत्व देणार असल्याचे सांगितले. भाजप अल्पसंख्यक आघाडीने मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी सरकारदरबारी मांडली आहे. शैक्षणिक विकास आणि सत्तेत वाटा मिळाल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक मुस्लिम नगरसेवकाने २० मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलावी असा निर्णय झाल्याचेही सिद्दीकी यांनी सांगितले.
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी असलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांची मागील सरकारच्या काळात दुरवस्था झाली होती. आता ती दुरवस्था दूर केली जात आहे. येत्या फेब्रुवारी-मार्चपर्यंत राज्यातील बहुतांश महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, असे ते म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, अल्पसंख्यक आघाडीचे कलाम शेख, मोहसीन खान, भाजप शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)