‘मिनी मंत्रालय’ कोणाच्या ताब्यात?

By admin | Published: July 6, 2015 01:11 AM2015-07-06T01:11:36+5:302015-07-06T01:11:36+5:30

जिल्हा परिषदेसह आठही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.६) लागणार आहे.

'Mini Ministry' in whose possession? | ‘मिनी मंत्रालय’ कोणाच्या ताब्यात?

‘मिनी मंत्रालय’ कोणाच्या ताब्यात?

Next

आज फैसला : ६६० उमेदवारांचे भाग्य ठरणार
गोंदिया : जिल्हा परिषदेसह आठही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.६) लागणार आहे. सकाळी १० वाजतापासून तालुकास्थळी होणाऱ्या या मतमोजणीची उत्सुकता सर्वांना लागली असून ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश येते की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जिल्हा परिषदेवर कब्जा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी २३७ तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी ४२३ असे एकूण ६६० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत बहुसंख्य ठिकाणी होती.
विशेष म्हणजे ५० टक्के महिला आरक्षणामुळे योग्य अशा महिला उमेदवार निवडताना सर्वच पक्षांची शेवटपर्यंत तारांबळ उडाली होती. काहींनी स्वकर्तृत्वावर तर काहींनी पक्षाच्या ताकदीने पूर्ण ताकद लावून निवडणूक लढली. पण मतदार राजाने कोणाच्या झोळीत बहुमताचे दान टाकले हे सोमवारच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
या ठिकाणी होणार मतमोजणी
३० जूनला झालेल्या मतदानानंतर गेले पाच दिवस मतदान यंत्र (ईव्हीएम) ठिकठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये सीलबंद करून ठेवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी हे सील उघडून १० वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघांची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन फुलचूरपेठ, फुलचूर येथे, आमगाव व अर्जुनी मोरगाव तालुक्याची मतमोजणी तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात, सालेकसा, तिरोडा, गोरेगाव व देवरी येथील मतमोजणी तेथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय), तर सडक अर्जुनी तालुक्याची मतमोजणी तेथील तहसील कार्यालयात होणार आहे.

Web Title: 'Mini Ministry' in whose possession?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.