मिनी मंत्रालयाचा २८ कोटीचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:36 PM2019-02-28T22:36:51+5:302019-02-28T22:37:16+5:30
गोंदिया जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा सुधारीत व २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रुपयांचा संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.उपाध्यक्ष अल्लाफ हमीद यांनी गुरूवारी (दि.२८) सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करीत हा निधी ७ वरुन ८ लाख रुपये करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा सुधारीत व २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रुपयांचा संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.उपाध्यक्ष अल्लाफ हमीद यांनी गुरूवारी (दि.२८) सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करीत हा निधी ७ वरुन ८ लाख रुपये करण्यात आला. पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर भरीव तरतूद करण्यात आली.
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा गुरूवारी (दि.२८) दुपारी जि.प.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. जि.प.उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती अल्लाफ हमीद यांनी दुपारी १ वाजता अर्थसंकल्प सादर केला. या वेळी सन २०१८-१९ चा ३३ कोटी ४१ लाख ९३ हजार रुपयांचा सुधारित तर सन २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रूपयांचा संभावित अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणारा निधी ८ लाख रूपये करण्यात आला. तर दुकान गाळे बांधकामासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाणी व शौचालयांची व्यवस्था करण्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जाम्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलसाठी विशेष निधी अंतर्गत ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदानासाठी ८६ लाख रुपये, दिव्यांगाना तीन चाकी सायकल,श्रवणयंत्र, संगणक प्रशिक्षण यासाठी १७ लाख व महिलांना शिलाई मशिन, सौरकंदील व अंगणवाडी दुरूस्तीसाठी १ कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकरिता १ कोटी ५० लाख व कृषी विभागासाठी मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्के निधीत वाढ केली आहे.
पंचायत विभागातंर्गत महाआॅनलाईनचे संगणक आॅपरेटर यांचे थकीत मानधन देण्यासाठी नवीन लेखाशिर्ष तयार करण्यात आला आहे. या वेळी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, रमेश चुºहे, पी.जी.कटरे, सुरेश हर्षे, उषा शहारे, उषा मेंढे या सदस्यांनी बांधकामासाठी करण्यात आलेल्या निधीत कपात करुन तो निधी कृषी आणि पाणी पुरवठा विभागासाठी वाढविण्याची मागणी केली. सेंद्रिय शेती व तसेच कृषी विषयक योजनांवर भर देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करीत या योजनांवरील निधीत वाढ करण्यात आली.
अर्थसंकल्पाची वैशिष्टये
शहीद जाम्या तिम्या हायस्कूलसाठी ५ लाखांची तरतूद
प्रत्येक जि.प.शाळेत शौचालय व शुध्द पाण्याची सुविधा
दुकान गाळे बांधकामासाठी १ कोटी रुपये
संगणक आॅपरेटरच्या मानधनासाठी निधीची तरतूद
दिव्यांगाना साहित्य वाटपासाठी दीड कोटी
उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार
अंगणवाडी इमारतीची दुरूस्ती करणार