सीमा तपासणी नाक्यावर वाहन चालकांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:55 PM2018-09-24T21:55:00+5:302018-09-24T21:55:41+5:30
महाराष्ट्र सीमेवरील शिरपूर येथील चेक पोस्टवर सद्भाव कंपनीतर्फे वजन काट्यात बिघाड करुन अंडरलोड ट्रकला ओव्हरलोड दाखवून वाहन चालकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : महाराष्ट्र सीमेवरील शिरपूर येथील चेक पोस्टवर सद्भाव कंपनीतर्फे वजन काट्यात बिघाड करुन अंडरलोड ट्रकला ओव्हरलोड दाखवून वाहन चालकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तर अंडरलोड ट्रक ओव्हरलोड झाला कसा झाला असा संतप्त सवाल ट्रक मालक मनजीतसिंग भाटीया यांनी केला. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन कंपनीच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक सीजी ०४- व्ही ९९२२ देवरीकडून रायपूरकडे जात असताना ट्रक मालकांने देवरी येथे ट्रकचे वजन केले असता ट्रक अंडरलोड ४४००० किलो इतके होते.
सिरपूर येथील सदभाव कंपनीने या ट्रकचे पहिल्यांदा वजन केले असता वजन ४४२२० किलो इतके भरले. नियमानुसार १२० किलो वजन जास्त असल्याचे निदर्शनात आले. परंतु ट्रक मालकाने वजन काट्यावर आक्षेप घेत पुन्हा दुसºया काट्यावर वजन करायला लावले असता ४४००० इतके भरले.
यानुसार कंपनीच्या वजन काट्यात काहीतरी गडबड असल्याचे ट्रक मालकाच्या लक्षात आले. यावर त्यांनी आक्षेप घेत पत्रकारांना बोलावून या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली.
याबाबत येथे कार्यरत बीसीपी मॅनेजर पंकज त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे वजन काट्याच्या बिघाडाचा भुर्दंड हा वाहन मालकांवर बसत असून ट्रक ओव्हरलोड आढळल्यास १५ ते २० हजार रुपयाचा दंड ट्रक मालकास भरावा लागतो. तेव्हा इथून ट्रक सोडले जाते.
परंतु शासनाने भारक्षमता निर्धारित केल्यापासून कुणीही ओव्हरलोड माल भरत नाही. शिरपूर येथील सदभाव कंपनी अंडरलोड ट्रकला ओव्हरलोड दाखवून ट्रक मालकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मनजीतसिंग भाटीया यांनी केला आहे.
यापूर्वी सुध्दा असा प्रकार ट्रान्सपोर्टर संघटनेने निदर्शनास आणून दिला होता. तसेच याची परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु यावर कोणतीच कारवाई कंपनीवर झाली नसल्याने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे मोटर वाहन निरीक्षक (आरटीओ)अधिकारी मात्र पूर्णपणे हतबल झाले असून त्यांना कुठलेच अधिकार नसल्याची बाब पुढे आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी परिवहन आयुक्तांना केलेल्या तक्रारीतून ट्रक मालक मनजीतसिंग भाटीया यांनी केली आहे.