२५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज ‘मिस मॅच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 09:10 PM2018-01-29T21:10:00+5:302018-01-29T21:10:18+5:30
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी जाहीर केली. मात्र सात महिन्याचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी अद्यापही वेटींगवर आहे. तर तब्बल २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी शासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन असल्याने याला अधिक विलंब होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील एकूण ८४ हजार शेतकरी पात्र असल्याचा दावा शासनानेच केला. पण, आत्तापर्यंत यापैकी केवळ ४१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही अर्धे शेतकरी वेटींगवर असल्याचे चित्र आहे.
शेतकरी कर्जमाफीकरिता जिल्ह्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी आत्तापर्यंत केवळ ४१ हजार २५१ अर्ज पात्र ठरले असून त्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिली. जिल्हा बँकेने आत्तापर्यंत २८ हजार ५४ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीच्या रक्कमेपोटी ८९ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या १३ हजार २५१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ कोटी ६८ लाख रुपये जमा केले असून आत्तापर्यंत एकूण ४१ हजार २५१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे.
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्हा बँकेचे एकूण ७३ हजार शेतकरी सभासद पात्र ठरले होते. त्यापैकी ४१ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. तर २५ हजार शेतकºयांचे अर्ज आणि बँकाची माहिती जुळत नसल्याने हे अर्ज तातपुरते अपात्र ठरविण्यात आल्याची माहिती आहे. कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात जिल्हा बँकेने आघाडी घेतली असली तरी राष्ट्रीयकृत बँका यात माघारल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
अधिकाऱ्यांचा वॉच
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सात महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही यातील घोळ संपत नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी अद्यापही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने प्रत्येकी दोन जिल्ह्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल झाले असून बँका आणि सहकार निबंधक कार्यालयाकडून कर्जमाफीच्या प्रक्रियेचा आढावा घेत आहेत.
पुन्हा दोन महिने लागणार
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र या अर्जातील माहिती आणि बँकाची माहिती जुळत नसल्याने बँकाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.आत्तापर्यंत केवळ ४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून अर्धे शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या प्रक्रियेस पुन्हा दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.