शिक्षण विभागाचे मिशन ड्रॉप बॉक्स निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:28 AM2018-10-31T00:28:10+5:302018-10-31T00:29:06+5:30
एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या दुसºया वर्षीही सारखी असायला पाहीजे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत दुसºया वर्षात यंदा १५७५ विद्यार्थी गेले कुठे हे शोधण्यासाठी मिशन ड्राप बॉक्स सुरू करण्यात आले आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या दुसºया वर्षीही सारखी असायला पाहीजे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या वर्षात यंदा १५७५ विद्यार्थी गेले कुठे हे शोधण्यासाठी मिशन ड्राप बॉक्स सुरू करण्यात आले आहे. यामाध्यमातून ही संख्या शुन्यावर आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने सुरू केला आहे.
आमगाव तालुक्यातील १०८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २३१, देवरी तालुक्यातील १८६, गोंदिया तालुक्यातील ७६०, गोरेगाव तालुक्यातील १०२, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६९, सालेकसा तालुक्यातील ५५, तिरोडा तालुक्यातील ६४ असे एकूण १५७५ बालके ड्राप बॉक्स मध्ये आहेत. त्या बालकांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मिशन ड्राप बॉक्स निरंक करण्यासाठी जोमाने सुरूवात केली आहे.
यासाठी बालरक्षक कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. जिल्ह्यातील २०२ बालरक्षकांनी समता व जिल्ह्यातील लिंकमध्ये नोंदणी केली आहे. १७५ बालरक्षकांनी या कार्यशाळेला हजेरी लावून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे आणायचे यावर टीप्स घेतल्या.
ड्राप बॉक्स निरंक कसे करता येईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थ्यांची संख्या शुन्यावर कशी आणता येईल यावर माहिती देण्यात आली.
विद्यार्थी निहाय माहिती कशी काढावी,शाळाबाह्य मुलांची सांख्यीकी माहिती, उपाययोजना, नियोजन व केस स्टडी लिहिण्याची पद्धत, बालरक्षक नोंदणी लिंक व टास्क लिंक यावर सखोल माहिती देऊन यंत्रणा कामाला लागली आहे.
प्रत्येक मूल शाळेच्या मुख्यप्रवाहात आले पाहिजेत. त्यासाठीच बालरक्षक चळवळ सुरु करण्यात आली आहे. बालरक्षकांमध्ये आत्मीयता व सहानुभुतीची आवश्यकता आहे. याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात आले.
काय आहे ड्रॉप बॉक्स?
मोहीम इयत्ता पहिली ते सातवी पर्यतंच्या मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि यंदा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांची पटसंख्या काढली जाते. मागीलवर्षी जेवढे विद्यार्थी उर्तीण झाले तेवढ्याच विद्यार्थ्यांची पटसंख्या पुढील वर्गात असणे आवश्यक आहे. मात्र ती मागीलवर्षीच्या तुलनेत १५७५ ने कमी आढळली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला अथवा हे विद्यार्थी शाळाबाह्य झाले किंवा त्यांचे दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरण झाले. याचा शोध घेण्याच्या मोहीमेला मिशन ड्रॉप बॉक्स हे नाव देण्यात आले आहे.
११ दिवसात शून्य गाठा
बालरक्षक व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी ११ दिवसात ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी संख्या शून्यावर आणण्याचा उपक्रम करण्याचे शिक्षणाधिकारी(प्राथ) उल्हास नरड यांनी सांगितले. बालरक्षक चळवळ गतीने होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहे.