अन् आमदारही थिरकले दंडार नृत्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 01:16 PM2021-11-16T13:16:35+5:302021-11-16T13:33:05+5:30
अर्जुनी- मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी चक्क दंडार नृत्यातच फेर धरला. कलावंतांच्या कलेला दाद देण्यासाठी आमदार स्वतःला थांबवू शकले नाही आणि चक्क त्या कलावंतांमध्ये सामील होऊन दंडारीच्या तालावर थिरकले.
गोंदिया : गोंदिया- भंडारा जिल्ह्यात दिवाळीनंतर ‘दंडार’चा पारंपरिक वारसा जपला जातो. येथील अशाच एका दंडार नृत्यात चक्क आमदारांनीच ताल धरल्याने उपस्थित बघे अवाक् झाले.
पूर्व विदर्भातील भंडारा- गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जिल्हे झाडीपट्टीच्या नावाने परिचित आहेत. झाडीपट्टीची दंडार सर्वदूर प्रसिद्ध आहे. ही लोककला आता राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे. दिवाळीनंतरच्या मंडईपासूनच झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांचा पडदा उघडतो. या जिल्ह्यातील बोलीभाषा सर्वांना आपलीशी करणारी आहे. विविध प्राचीन परंपरांचा या परिसरातील नागरिकांवर पगडा आहे. स्त्रीची वेशभूषा करून डफळीच्या तालावर वयस्क, तरुण युवक व बालक थिरकतात. दंडारीत नाच्यासोबत विनोदी खडे सोंग दाखविले जातात. पुरुष नर्तक स्त्रीची वेशभूषा धारण करतात. पायात घुंगरू घालून ढोलकीच्या तालावर नृत्य करतात. अर्जुनी- मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी चक्क दंडार नृत्यातच फेर धरला.
कलावंतांच्या कलेला दाद देण्यासाठी आमदार स्वतःला थांबवू शकले नाही आणि चक्क त्या कलावंतांमध्ये सामील होऊन दंडारीच्या तालावर थिरकले. आमदार दंडारच्या मोहात पडल्याचे बघून उपस्थितांनीसुद्धा भरभरून दाद दिली. झाडीपट्टी लोककलेत किती ताकद आहे, हे यावरून स्पष्ट होते. सध्या ही चित्रफीत समाजमाध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे. झाडीपट्टीतील या लोककला जिवंत राहाव्यात यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.
या भागात दिवाळीनंतर मंडईला मोठे महत्त्व आहे. तालुक्यापासून तर छोट्याशा गावापर्यंत प्रत्येक गावात मंडई साजरी केली जाते. या मंडईच्या निमित्ताने मित्र, नातेवाईक, बाहेर कामासाठी गेलेली मंडळी गावाकडे येतात. या सर्वांच्या मनोरंजनासाठी रात्रीला दंडार, नाटक, तमाशा, अशा पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंडईमध्ये दिवसा होणाऱ्या दंडारचे प्रमाण अधिक असते. ज्या गावात दंडार असते. तेथील दंडार चमू विविध वेशभूषेत नाच, वादन आणि गायनातून मनोरंजन करतात. प्रेक्षक या दंडारीचा मनमुराद आनंद लुटतात. या लोककलांना राजाश्रय मिळण्याची गरज आहे.