मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदाराचे थेट रस्त्यावर झोपून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 01:10 PM2022-12-12T13:10:27+5:302022-12-12T15:28:43+5:30
खमारी येथील प्रकरण
गोंदिया : भरधाव वेगात असलेल्या टिप्परच्या धडकेत सायकलस्वार राजेश ज्ञानस्वरूप लिल्हारे (३५, रा. खमारी) या तरुणाचा मृत्यू झाला. लगतच्या ग्राम खमारी येथे शनिवारी (दि. १०) सायंकाळी सात वाजतादरम्यान हा अपघात घडला. यानंतर मात्र खमारी येथील परिस्थिती चिघळली होती. आमदार विनोद अग्रवाल यांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठून मृताच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर झोपून आंदोलन केले.
प्राप्त माहितीनुसार, राजेश लिल्हारे शनिवारी सायंकाळी सात वाजता दरम्यान कामावरून सायकलने घरी जात असताना गोंदियाहून आमगावकडे जात असलेल्या टिप्परने त्याला भरधाव वेगात धडक दिली व पसार झाला. या अपघातात राजेश जागीच ठार झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांत चांगलाच रोष निर्माण झाला व त्यांनी रस्त्यावर सिमेंटचे पाइप टाकून रास्ता रोको आंदोलन केले. तर दुसरीकडे पोलिसांनी कंत्राटदारासोबत मिळून राजेशचा मृतदेह कुटुंबीयांना माहिती न देता घटनास्थळावरून उचलून नेला. याबाबत आमदार विनोद अग्रवाल यांना माहिती मिळाली असता ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत राजेशच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी रात्री उशिरा रस्त्याच्या मधोमध झोपून जनतेसोबत आंदोलनाची भूमिका घेतली.
तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना मृतदेह आणण्यास सांगितले आणि जोपर्यंत मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा घेतला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी घटनेतील दोषी व कंत्राटदारावर कायदेशीर कलमाखाली गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. यावेळी सभापती मुनेश रहांगडाले, पंचायत समिती सदस्य कनीराम तावाडे, सरपंच होमेंद्र भांडारकर, शेखर वाढवे, रंजित गायधने, बाबा नागपुरे, सुरेश मचाडे, प्रल्हाद बनोटे व कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.
मृताच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत
मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट देऊन आमदार अग्रवाल यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही शासनातर्फे मदत जाहीर करण्याकरिता मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले. कंत्राटदाराची अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाच्या संगनमताने कारवाई झाली नाही, याबाबतही चर्चा करणार आहे.