आमदारांनी केली डांगोर्ली घाट बांधकामाची पाहणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:41+5:302021-07-17T04:23:41+5:30
गोंदिया : शेजारच्या मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मधातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर डांगोर्ली घाट येथे ३३ कोटींच्या निधीतून ...
गोंदिया : शेजारच्या मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मधातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर डांगोर्ली घाट येथे ३३ कोटींच्या निधीतून आंतरराज्य पुलाचे बांधकाम सुरू असून आमदार विनोद अग्रवाल यांनी या बांधकामाची पाहणी केली.
या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन ७ मार्च २०१९ रोजी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामांतर्गत नदीत पिल्लर तयार झाले असून दोन्ही बाजूंनी पुलाचा भाग तयार केला जात आहे. पावसाळ्यानंतर आणखी जोमात पुलाचे बांधकाम केले जाणार असल्याचे कंत्राटदार कंपनीने सांगितले आहे. मध्य प्रदेशातील वारासिवनी-बेनी-साकडी होत महाराष्ट्रातील डांगोर्लीपर्यंत थेट रस्त्याला जोडण्यासाठी वैनगंगा नदीवर हा पूल तयार केला जात आहे. या पुलामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्र हे दोन्ही राज्य नुसते जुळणार नसून या पुलामुळे या नदीकाठावरील ६०-७० गावांनाही याचा फायदा होणार आहे. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांच्यासोबतच तेढवाचे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता छत्रपाल तुरकर, डांगोर्लीचे माजी सरपंच परसराम पाचे व मुन्ना पिपरेवार उपस्थित होते.
----------------------------
‘रोटी बेटीचे’ नाते कायम राहणार
मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्याचा बहुतांश भाग महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे. यामुळे या भागातील लोकांचे महाराष्ट्रात ‘बेटी-रोटी’चे नाते कायम आहे. रेल्वे मार्गाने बालाघाट-गोंदिया प्रवासी गाडी व रस्ते मार्गाने गोंदिया-रजेगाव-बालाघाट थेट रस्ता आहे. यामुळे वारासिवनी-कटंगी-खैरलांजी मार्गाने नागरिक रस्त्याने प्रवास करीत बालाघाट-रजेगाव होत गोंदियाला येतात. यात त्यांना जास्त वेळ व भाडे लागत होते. मात्र आता या भागातील नागरिकांना बालाघाट-रजेगाव फेरा न मारता थेट बेनी-साकडी-डांगाेर्ली मार्गाने गोंदियाला जोडता येणार आहे.