आमदारांनी लावली अभियंत्यांच्या कानशिलात; गाेंदियातील धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 08:59 PM2022-08-29T20:59:36+5:302022-08-29T21:00:28+5:30
Gondia News मुर्री येथील एका ग्राहकाची वीजजोडणी कापल्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणच्या ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश तमगाले यांच्या कानशिलात लगावली.
गोंदिया : मुर्री येथील एका ग्राहकाची वीजजोडणी कापल्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणच्या ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश तमगाले यांच्या कानशिलात लगावली. सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सूर्याटोला उपविभाग कार्यालयात ही घटना घडली. या घटनेनंतर वीज अभियंत्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याची मागणी केली. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
वीज अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगतच्या ग्राम मुर्री निवासी लारोकर यांच्यावर ११ हजार रुपयांचे वीजबिल थकित असून यासाठी वीज अभियंता शुक्रवारी त्याच्याकडे गेले होते. यावर त्याने सोमवारी बिल भरतो असे म्हणत वेळ मागितली. मात्र सोमवारी बिलाच्या रकमेतील ४००० रुपये भरतो व उर्वरित रक्कम नंतर भरणार असे म्हटले. त्यामुळे त्यांची वीजजोडणी कापण्यात आली. या प्रकरणाला घेऊन आमदार अग्रवाल महावितरणच्या सूर्याटोला येथील उपविभाग कार्यालयात गेले. तेथे उपस्थित असलेल्या उपकार्यकारी अभियंत्यांना एक-दोन नव्हे तर तब्बल पाच झापड मारल्या.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकारामुळे संतापलेल्या वीज अभियंत्यांना लगेच रामनगर पोलीस ठाणे गाठून आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच या घटनेला घेऊन अभियंत्यांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, गुन्हा दाखल होतपर्यंत आंदोलन सुरू राहणार व त्यात दरम्यान काही समस्या आल्यास त्यासाठी जबाबदार राहणार नाही, अशा इशारा दिला आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.