मनरेगाला निधीचा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:12 PM2018-04-17T22:12:51+5:302018-04-17T22:12:51+5:30
दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कुशल-अकुशल कामे उपलब्ध करुन देण्यात आली.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कुशल-अकुशल कामे उपलब्ध करुन देण्यात आली. यामुळे हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र दिवसभर घाम गाळून चार पैसे हाती पडतील अशी अपेक्षा मजुरांना होती. पण शासनाकडून निधी न मिळाल्याने मनरेगाला निधीचा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या अभियानांतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात जिल्हा राज्यात अव्वल आला. परंतु दुसरीकडे कुशल-अकुशल कामाचे पैसे प्रलंबित ठेवण्यात जिल्हा राज्यात अव्वल आहे. सन २०१७-१८ मध्ये राज्यात मनरेगाच्या कामाचे २८३ कोटी १२ लाख ५ हजार रूपये प्रलंबित आहेत. यातील २६४ कोटी ४६ लाख ९७ हजार कुशल तर १८ कोटी १७ लाख १३ हजार अकुशल कामाचे आहेत. जिल्ह्यातील ३६ कोेटी ३ लाख ५२ हजार रूपये निधी शासनाने अद्यापही दिला नाही. यातील ३५ कोटी ६३ लाख १५ हजार कुशल तर ३९ लाख ९६ हजार अकुशल कामाचे प्रलंबित आहेत. यात जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील १२ कोटी ५ लाख ७४ हजार, अर्जुनी-मोरगाव ५ कोटी एक लाख ९१ हजार रूपये, सालेकसा ४ कोटी ५० लाख ६१ हजार, आमगाव ३ कोटी ७१ लाख ७४ हजार रूपये, गोरेगाव तालुक्याचे ३ कोटी २ लाख ४४ हजार रूपये, सडक-अर्जुनी २ कोटी ८२ लाख ४८ हजार रूपये, गोंदिया २ कोटी ६२ लाख ८८ हजार व तिरोडा २ कोटी २५ लाख ७३ हजार रूपये प्रलंबित आहेत. कुशल कामाचे पैसे मोठ्या प्रमाणात न मिळाल्यामुळे, घरकुल, शौचालयाचे बांधकाम ठप्प पडले आहे.
बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या दुकानदारांनी आधी उधारी द्या नंतरच साहित्य पुरवठा करु अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे एकीकडे सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्याचा दावा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी शिल्लक आहे.
चंद्रपूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
गोंदियानंतर राज्यात नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे २९ कोटी ३२ लाख ७७ हजार रूपये प्रलंबित आहेत. यात २९ कोटी १३ लाख ५५ हजार कुशल तर १८ लाख ६ हजार अकुशल मजुरीचे प्रलंबित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अमरावती असून या जिल्ह्याचे २४ कोटी २८ लाख ८ हजार रूपये प्रलंबित आहेत. यात २३ कोटी १३ लाख १७ हजार कुशल तर एक कोटी १२ लाख ६६ हजार अकुशल मजुरीचे आहेत.