आता मोबाइल ॲप लावणार वाहन अपघातांना ब्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:20+5:302021-07-04T04:20:20+5:30
गोंदिया : अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने वर्षाकाठी लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. हे मृत्यू टाळण्यासाठी तसेच घडलेल्या अपघाताचे कारण, ...
गोंदिया : अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने वर्षाकाठी लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. हे मृत्यू टाळण्यासाठी तसेच घडलेल्या अपघाताचे कारण, घटनास्थळावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना करून अपघातांना ब्रेक लावण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला. गोंदिया जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशा ६४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघात टाळण्यासाठी शोधून काढलेले हे ॲप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा ठाणेदार हा ॲडमिन तर बाकीचे अधिकारी, कर्मचारी हे फिल्ड ऑफिसर म्हणून यामध्ये काम करण्यात आले आहे. ॲडमिनची एक युजर आयडी असते. तो त्या गाडीत किती अपघात घडले याची नोंद घेण्यात आली किंवा नाही हे स्वतः पाहत असतो. आतापर्यंत दहा लाइव्ह केसेस इंट्री करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली आहे.
..............................
६४ जणांना प्रशिक्षण
गोंदिया जिल्ह्यात १६ पोलीस ठाणी आहेत. आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, डुग्गीपार, केशोरी, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा, गंगाझरी, दवनीवाडा, रावणवाडी, रामनगर, गोंदिया शहर व गोंदिया ग्रमीण अशा १६ पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशा ६४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत.
...........................
आतापर्यंत ९५ अपघातांची नोंद
-गोंदिया जिल्ह्यात सन २०२१ च्या सहा महिन्यांत ९५ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. ७२ लोक जखमी असल्याचे पुढे आले आहे. कोरोनामुळे संचारबंदी असली तरी देखील अपघाताची संख्या सहा महिन्यांत शेकडोंच्या घरात गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१९ मध्ये २६५ अपघात घडले होते. यात १६० जणांचा मृत्यू झाला, तर ३२४ जण जखमी झाले होते. सन २०२० मध्ये २१८ अपघात झाले होते. यात १४० जणांचा मृत्यू झाला आहे. यात २३७ लोक जखमी झाले आहेत.
.......................
असा करणार अभ्यास
-मोबाइल ॲपवर एखाद्या अपघाताची नोंद झालेली नसेल तर त्याची नोंद फिल्ड ऑफिसर घेईल. अपघाताचे कारण काय आहे, त्यावर अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्री अपघात झाला तर त्या घटनास्थळावर लाइट होती किंवा नव्हती याचा अभ्यास केला जाणार आहे.
-वाहनांना समोरचे वाहन दिसले किंवा नाही. लाइट लावण्याची गरज आहे का, पुलावर अपघात घडला असेल तर त्या पुलावर कठडे होते किंवा नाही. कठडे लावण्याची गरज आहे का, तसेच घटनास्थळाचे लाइव्ह लोकेशन त्या घटनास्थळाचा अक्षांश आणि रेखांश या ॲपमधून दिसणार आहे. एकंदरीत अपघातावर आळा घालण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे.
..........................................................
जिल्ह्यातील रस्ते अपघात
सन २०१९
रोड अपघात-२६५
जखमी -३२४
मृत्यू- १६०
.....
सन २०२०
रोड अपघात-२१८
जखमी -२३७
मृत्यू- १४०
.......
सन २०२१ जूनपर्यंत
रोड अपघात-९५
जखमी -७२
मृत्यू- ५४