खत वापरासाठी मोबाइल ॲप करणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:34+5:302021-06-04T04:22:34+5:30
गोंदिया : माती परीक्षण केल्यानंतर आरोग्य पत्रिकेवर दाखवलेल्या १२ घटकांच्या माहितीनुसार खतांची मात्रा नेमकी कशी द्यावी याविषयी शेतकऱ्यांमध्ये असलेला ...
गोंदिया : माती परीक्षण केल्यानंतर आरोग्य पत्रिकेवर दाखवलेल्या १२ घटकांच्या माहितीनुसार खतांची मात्रा नेमकी कशी द्यावी याविषयी शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होणार आहे. त्यासाठी मोबाइल ॲपची मदत घेता येईल, असे देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी स्पष्ट केले आहे.
कृषीक गणकयंत्राच्या माध्यमातून राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठीच्या खतमात्रा प्राप्त होण्यासाठी या ॲपचा वापर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सध्या केवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शिफारस असलेल्या पिकांसाठी ठिबकद्वारे देता येणाऱ्या खत मात्रांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर विद्यापीठांच्या ठिबक खतमात्रांची माहिती दिली जाणार आहे. कृषी विभाग व बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. गुगल प्ले-स्टोअरवर ‘कृषीक’ ॲप डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांच्या पीकनिहाय खत शिफारशी दिसतात. जमीन आरोग्य पत्रिकेवर आधारीत विविध पिकांच्या खतमात्रा, बाजारातील किमतीनुसार प्रती एकर खतमात्रांच्या खर्चाचा हिशेब करता येतो. नत्र, स्फुरद, पालाश वापरासाठी विविध खतांचे पर्याय, सरळ व संयुक्त खतांच्या शिफारशींचे पर्याय आणि गावनिहाय जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतमात्रांची माहिती या ॲपमधून मिळते, असे वावधने यांनी कळविले आहे.