पालांदूर-जमीदारीत इंटरनेटसह मोबाईल सेवा सतत बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:34+5:302021-08-01T04:26:34+5:30
फुटाणा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नेत्रदीपक प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागात विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचले नाही. ...
फुटाणा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नेत्रदीपक प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागात विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचले नाही. देवरी तालुक्यातील पालांदूर-जमीदारी गावात सध्या मोबाईल नेटवर्क समस्या गंभीर झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बीएसएनएलसह अन्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी गुडघे टेकले आहेत. त्यामुळे गावात मागील १५ दिवसांपासून मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा ठप्प आहे.
तालुक्यातील शेकडो गावांतील हजारो नागरिक आजघडीला नेटवर्क समस्येने अक्षरशः बेजार झाले आहेत. अनेक वर्ष दऱ्याखोऱ्यात डोंगराळ भागात सुरळीत चालणारे बीएसएनएल नेटवर्क सद्यस्थितीत बंद आहे. तालुका प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना केल्या नाहीत. समस्या कायम आहे. तालुक्यात दुर्गम भागात अनेक ठिकाणी बीएसएनएल सोडून अन्य कोणत्याही कंपनीचे टॉवर व नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे. पालांदुर-जमींदारी गावाला या समस्यांनी अधिक विळखा घातला आहे. रेंज नसल्यामुळे रुग्णाला अथवा अपघातग्रस्ताला दवाखान्यात नेण्याकरिता रुग्णवाहिका अथवा वाहन बोलविणे देखील कठीण होऊन बसले आहे. या भागात बीएसएनएल मोबाईल नेटवर्क सेवा पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरती जांगळे यांनी केली आहे.
---------------------
या गावातील लोकांना बसतो फटका
पालांदूर-जमींदारीसह गरारटोला, टेकरी, बाळापूर, मगरडोह, चिलमटोला, ढोडरा, रोपा, सुकळी, सिंगनडोह, रामगड, घोनाडी, सर्रेगाव, कळुझरी, पळसगाव यासह अन्य काही गावे व आदिवासी वाड्या मोबाईल सेवेपासून वंचित आहेत.
-----------------------------
विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण फसले
पालांदूर-जमींदारी क्षेत्रात मोबाईल टॉवर नसल्याने तेथील ग्रामस्थांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत असून नेटवर्क अभावी त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. ऑनलाइन परीक्षा कशा द्याव्यात असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.