मोबाइल चोरून नेला, मात्र विकताना अडकले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By नरेश रहिले | Published: May 15, 2024 07:50 PM2024-05-15T19:50:30+5:302024-05-15T19:50:45+5:30
धावत्या दुचाकीवरून हिसकावला होता मोबाईल
गोंदिया : तरूणाचा मोबाईल हिसकावून नेल्यानंतर त्याला विकत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्याला पकडले व त्याच्या माहितीवरून दुसऱ्यालाही अटक केली आहे. गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत लोधीटोला ओझीटोला दरम्यान दोघांनी २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दरम्यान मोबाईल तरूणाकडून हिसकावून घेतला होता.
सविस्तर असे की, २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दरम्यान प्रशांत भीमराव भावे (३२) हा तरुण आपला मित्र सागर नरेंद्र डोंगरे याच्यासोबत हॉटेल जंगल स्ट्रीट मध्ये जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी लोधीटोला ते ओझीटोलादरम्यान सागर डोंगरे याच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला होता.
गंगाझरी पोलिसात प्रकरणी भादंवि कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात हवालदार तुलसीदास लुटे, इंद्रजित बिसेन, शिपाई संतोष केदार, अजय रहांगडाले करीत होते. यातच त्यांना राज उर्फ मारी सुशिल जोसेफ (२२,रा.शितला माता मंदिर जवळ, गौतमनगर) हा गौतमनगर परिसरात मोबाईल विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
यावर पथकाने मंगळवारी (दि.१३) राज जोसेफ याला गौतनगरातच ताब्यात घेतले व आपल्या पद्धतीने विचारपूस केली. यावर त्याने गणेश राहुल नागदेवे (२२, रा. डब्लिंग कॉलनी, सिव्हील लाईन, गोंदिया) याच्यासोबत मोबाईल हिसकाविल्याची कबुली दिली. पथकाने यानंतर राहुल नागदेवे यालाही ताब्यात घेतले असून दोघांना शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.