मोबाईल चोरट्यास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:33 PM2019-05-30T21:33:58+5:302019-05-30T21:35:10+5:30
आठवडी बाजारात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या मोबाईल चोरट्यास येथील पोलिसांच्या पथकाने पकडले. रेल्वेतील प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणारा हा चोरटा आहे. सोमवारी (दि.२७) पथकाने ही कारवाई केली असून त्याच्यांकडून चोरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आठवडी बाजारात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या मोबाईल चोरट्यास येथील पोलिसांच्या पथकाने पकडले. रेल्वेतील प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणारा हा चोरटा आहे. सोमवारी (दि.२७) पथकाने ही कारवाई केली असून त्याच्यांकडून चोरलेले पाच मोबाईल जप्त करण्यात आले.
आठवडी बाजारात चोरीच्या घटनांतील वाढ याकडे लक्ष देत ठाणेदार राजकुमार डुणगे यांनी हवालदार यशवंत शहारे, नायक योगेश बिसेन व शिपाई संतोष चुटे यांची सोमवारी (दि.२७) आठवडी बाजारात बंदोबस्त ड्यूटी लावली होती. ड्यूटीदरम्यान पथकाला एक तरूण संशयास्पद स्थितीत वावरताना आढळला.
यावर पथकाने त्या तरूणास पकडून विचारपूस केली असता त्याने अमित अभिजीत सिकंदर (२६) रा.कलवा,ठाणे असे नाव सांगीतले.तसेच अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने हावडाला जात असताना सालेकसा स्थानकावर पाणी पिण्यासाठी उतरला असता गाडी सुटल्याचेही सांगीतले. मात्र विचारपूस दरम्यान उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटमधून पाच एॅँड्रॉईड मोबाईल मिळाले.
यानंतर त्याने गाडीत प्रवासी झोपले असता त्यांचे मोबाईल चोरत असल्याचे पथकाला सांगीतले. पथकाने भांदवीच्या कलम ४१(१) अटक करून कलम १२४ मपोका अंतर्गत त्याला आमगाव येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.