शालेय विद्यार्थ्यांना मिळावे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण
By admin | Published: January 15, 2017 12:38 AM2017-01-15T00:38:02+5:302017-01-15T00:38:02+5:30
आजच्या विज्ञान युगात शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देणे ही काळाची गरज झाली आहे.
संजय पुराम यांचे प्रतिपादन: मल्हारबोडीतील डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन
देवरी : आजच्या विज्ञान युगात शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुध्दा तशी तयारी ठेवावी, असे प्रतिपादन आ.संजय पुराम यानी केले.
जि.प.विभागांतर्गत पंचायत समिती देवरी येथील चिचेवाडा केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा मल्हारबोडी येथील डिजीटल वर्गखोलीच्या उद्घाटन समारोहाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी विधानसभा क्षेत्रात झपाट्याने लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या डिजीटल शाळा आणि त्यासाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षक व पालकवर्गाचा आभार व्यक्त केला. विद्येची देवी माता सरस्वती व शिक्षण जननी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली डिजीटल वर्गखोलीचे आ. पुराम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पं.स.सभापती देवकी मरई, जि.प.सदस्य सरिता रहांगडाले, पं.स.सदस्य अर्चना ताराम, भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदिप लांजेवार, सरपंचा खोब्रागडे, कुरसुंगे, गटशिक्षणाधिकारी साकुरे, शिक्षण विस्तार अधिकारी दिघोरे, गटसमन्वयक लोकनाथ तितराम, गटसाधन केंद्रातील सर्व विषयतज्ञ उपस्थित होते.
डिजीटल वर्ग खोलीच्या उद्घाटन समारोहाप्रसंगी चिचेवाडा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शा.व्य.स.अध्यक्ष व सरपंच यांची कार्यप्रेरणा कार्यशाळेचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी विषय तज्ञांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, डिजीटल शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी डिजीटल शाळा करण्यासाठी अधिक लोकांनी सहकार्य करून गोंदिया जिल्ह्यातून शिक्षण क्रांती घडवून आणू असा संकल्प केला. प्रास्ताविक केंद्रप्रमुख जी.एम.बैस, संचालन बंसोड तर आभार मुख्याध्यापक खेडीकर यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सहायक शिक्षक खांडवाये यांच्यासह सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती मल्हारबोडी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)