मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:16+5:302021-06-05T04:22:16+5:30
आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल सडक-अर्जुनी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय ...
आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका दाखल
सडक-अर्जुनी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे आठ महिन्यांनंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाली आहे. ही रुग्णवाहिका जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत फक्त गर्भवती माता व एक वर्षापर्यंतच्या बालकांना दवाखान्यात नेण्याकरिता तत्पर राहील. खासगी वाहनाने रुग्णांची रवानगी केली जात असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांची वेळ व पैशाची परवड होत असे.
जिल्ह्यात कृषिपंप चोरटे झाले सक्रिय
पांढरी : सिंचनासाठी विहीर, नदीनाल्यावर लावलेले कृषिपंप चोरीस जाण्याच्या घटनांत जिल्ह्यात वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत असून, एखादी टोळी जिल्ह्यात सक्रिय असावी, अशी शंका निर्माण झाली आहे.
बैलबाजारांना उतरती कळा
बोंडगावदेवी : एकेकाळी प्रसिद्ध असलेला जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहे. भंडारा, कोंढा (कोसरा), अड्याळ, मासळ, लाखनी, लाखांदूर आदी ठिकाणी गेल्या काही वर्षांपर्यंत मोठे बैलबाजार भरत असत. आता ती परिस्थिती राहिली नाही.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
गोंदिया : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाले. वारंवार शासकीय उंबरठे झिजवावे लागतात.
रोजगार सेवकांना मानधन अत्यल्प
गोंदिया : लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवकांची जबाबदारी आहे. पण त्यांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
बेरोजगारांच्या हाताला काम द्या
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.
मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत
गोरेगाव : जिल्ह्यात सध्या धान कापणी व मळणीला जोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. मात्र, मजुरी वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
विडी उद्योगास उतरती कळा
गोंदिया : जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या विडी उद्योगास उतरती कळा लागली आहे. हे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांत वाढ
अर्जुनी-मोरगाव : ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. काही गावांत चोरटे भरदिवसा शिरून चोरी करीत आहेत. अनेक ठिकाणी दुकाने, पानटपऱ्या, हॉटेल फोडून साहित्य लंपास केले जात आहे. पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
फळबागांवर अवकाळी पावसाचे संकट
आमगाव : सध्या तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाचेही संकट आले. तालुक्यात दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यावर अवकाळी पावसाने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले; तर काही झाडांना या वादळी वाऱ्याचा फटका बसला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झालेला आहे. सकाळी ऊन तर सायंकाळी ढगाळ वातावरण राहत असताना वातावरणातील उष्माही प्रचंड वाढला आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाचा फटका कापणी केलेल्या रब्बी हंगामातील धानाला बसला. तोंडी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.
तिरोडा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीला ऊत
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील चांदोरी बुज. व घाटकुरोडा घाटातून अवैध वाळू वाहतुकीला उधाण आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घाटकुरोडा येथे दोन वाळू घाट आहेत. या दोन्ही घाटांना ग्रामपंचायतीने मंजुरी प्रदान केली आहे. मात्र, घाट क्रमांक एकचा लिलाव होऊ शकला नाही. तरीही या घाटातून अवैधरीत्या वाळू वाहतूक सर्रासपणे होत आहे, तसेच चांदोरी बुज. घाट लिलावात निघाले आहे. याची उत्खनन क्षमता अंदाजे केवळ २८०० ब्रास इतकी आहे; परंतु उत्खनन क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा करण्यात आला आहे. याची रीतसर तक्रार चांदोरी बुज. येथील काही नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली. मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी करून क्षमतेपेक्षा जास्त वाळू उत्खनन झाल्याचे सांगितले आहे. तरीदेखील अजूनही अवैधरीत्या वाळू उपसा सुरूच आहे.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी कपिल भोंडेकर व गावकऱ्यांनी केली आहे.