टवाळखोरी, छेड काढाल तर 'दामिनी' कडाडणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:43 PM2024-08-30T16:43:35+5:302024-08-30T16:45:38+5:30
गर्दीच्या ठिकाणी पथकाच्या भेटी : महिला, मुली व बालकांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिला, मुली व बालकांना अडचणीच्या वेळी तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक कार्य करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईही केली जात आहे.
पोलिस व जनता यांच्यात सुसंवाद वाढावा, मुली, महिला व बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा, त्यांना सुरक्षितता वाटावी व तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक गर्दीच्या ठिकाणी भेट देत आहे.
महिला, मुली व बालकांशी संवाद साधून त्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून संकटकाळात डायल-११२ या हेल्पलाइन क्रमांकावर कसा संपर्क साधावा, याबाबतही मार्गदर्शन करीत आहेत. गस्त घालण्यासाठी दामिनी पथकाला अत्याधुनिक वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून, शहर व परिसरातील गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत आहे.
शाळा-महाविद्यालयांत जाऊन तेथील विद्यार्थिनींना कायदेविषयक माहिती, वाहतुकीचे नियम, ऑनलाइन फसवणूक कशी टाळावी आदींची माहिती दिली जात आहे. यामुळे महिला, मुली व लहान बालकांना दिलासा मिळत आहे.
काय आहे दामिनी पथक?
मुली, महिला व बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने पथकाची स्थापना केली आहे. पीडितांना तत्काळ मदत मिळावी, यादृष्टीने पथक काम करते. सध्या ठिकठिकाणी पथकाकडून जनजागृती केली जात आहे.
तर रोमिओगिरी नेईल ठाण्यात
गोंदिया शहरातील परिसरात दामिनी पथक गस्त घालत आहे. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणा- यांवर पथकाकडून कारवाई केली जात आहे.
रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी टवाळखोरी केल्याचे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल केला जातो.
या ठिकाणी निर्भया पथकाचा वाँच
महाविद्यालय :
शाळा-महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग परिसरात दामिनी पथक भेट देत आहे. तेथील विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडेही दिले जात आहेत. तसेच जनजागृती केली जात आहे.
बसस्थानक
बसस्थानक, रेल्वेस्थानक, मुख्य बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक लक्ष ठेवून असते. साध्या वेशातही पोलिस अंमलदार गस्त घालतात.
गर्दीचे ठिकाण :
धार्मिक स्थळांच्या परिसरात महिला भाविक, मुलींना सुरक्षित वाटावे, यासाठी दामिनी पथकाकडून भेटी दिल्या जातात.