कर्जमाफीचे बँकेत आलेले पैसे गेले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 09:34 PM2018-07-26T21:34:16+5:302018-07-26T21:35:10+5:30
शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी अशी बिरुदावली देऊन मोठा गाजावाजा केला. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे बँक खात्यातून परत गेले आणि आता त्यांच्या नावावर संपूर्ण कर्जाची रक्कम शिल्लक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी अशी बिरुदावली देऊन मोठा गाजावाजा केला. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे बँक खात्यातून परत गेले आणि आता त्यांच्या नावावर संपूर्ण कर्जाची रक्कम शिल्लक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र शासनाने ऐतिहासीक कर्जमाफी जाहीर केली. या योजनेअंतर्गत एकमुस्त समझोता घडविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. मात्र यातही अनेक अफलातून प्र्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. याचे उत्तर ना प्रशासनाजवळ, ना बँक व्यवस्थापनाजवळ आहे.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविण्यात आले, मात्र कर्जाचा डोंगर कायमच असल्याने शेतकºयांत नाराजीचा सूर आहे.
अनिल लंजे या शेतकऱ्याने १० डिसेंबर २०१४ रोजी स्थानिक विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून १ लक्ष ३२ हजाराचे पीक कर्ज घेतले होते. ही कर्जराशी थकीत झाली होती. शासनाने २०१७ मध्ये शिवाजी महाराजांचे नाव देऊन ऐतिहासीक कर्जमाफी केली.
लंजे यांना या योजनेतंर्गत लाभ मिळण्यासाठी आपण पात्र असल्याचे विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा अर्जुनी-मोरगाव यांचे २० डिसेंबर २०१७ चे पत्र मिळाले. यात दीड लाख रुपयांचे कर्जमाफ होऊ शकते. मात्र दीड लाख रुपयांच्यावर असलेल्या राशीचा बँकेत रोख भरणा करावा लागेल असा उल्लेख आहे.
त्यानुसार लंजे यांनी २२ जानेवारीला बँकेत २० हजाराचा रोख भरणा केला. मात्र या २० हजार रुपयांची लंजे यांच्या बँक खात्यात कुठेही नोंद नाही. याऊलट २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे खात्यात ९४६५ रुपयांचा भरणा केला आहे व ५ मार्च रोजी या रकमेची कपात करण्यात आली आहे. त्यांचे भरलेले २० हजार रुपये गेले कुठे? हा सुध्दा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. आपल्याला कर्जमाफी मिळाली असेल याची शहानिशा करण्यासाठी ते बँकेत गेले तेव्हा कर्जमाफी अद्याप झालेली नाही, असेच उत्तर दिले जाते.
बँकाकडून टोलवाटोलवी
लंजे यांना यासंदर्भात भंडारा बँक मुख्यालयात जावून चौकशी करावी असे सांगीतल्या गेले. त्यानंतर त्यांनी भंडारा येथे जावून चौकशी केली तर ते अर्जुनी-मोरगावच्या बँकेतच जावून चौकशी करा असे उत्तर देण्यात आले. दरम्यान बँकाकडून नुसती टोलवाटोलवी सुरु आहे. कर्जमाफी मिळेल या आशेने उसनवारी करुन बँकेत २० हजार रुपये रोख भरले मात्र कर्जमाफी मिळाली नाही. उलट बँकेच्या पायऱ्या झिजवून मला मानसिकदृष्ट्या त्रस्त करण्याचा प्रकार बँकेने चालविला आहे. शासनाची ऐतिहासीक कर्जमाफी योजना फसवेगिरीची असल्याचा आरोप लंजे यांनी केला आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. बँकेत कर्जमाफीची राशी जमा होऊन शिल्लक राशी दर्शविण्यात आली. या कर्जमाफीच्या जमा झालेल्या राशीची नोंद ४० ते ५० दिवसापर्यंत कर्जदारांच्या खाते पुस्तिकेत राहिली मात्र कालांतराने पुन्हा ही राशी परत घेऊन त्यांचेवर पूर्वीसारखीच कर्जाची राशी कायम आहे. यामागील रहस्याचा उलगडा होऊ शकला नाही. कर्जमाफीच्या या गुत्थात तालुक्यातील अनेक शेतकरी गुरफटलेले आहेत. याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.