गोरेगावच्या खरेदी केंद्रात धानाला पावसाचा फटका
By admin | Published: May 25, 2016 02:03 AM2016-05-25T02:03:33+5:302016-05-25T02:03:33+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा मार्केटिग फेडरेशनच्या वतीने धान खरेदी केंद्र देण्यात आले.
शेतकऱ्यांचा रोष : अखेर तोलाई सुरू
गोरेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा मार्केटिग फेडरेशनच्या वतीने धान खरेदी केंद्र देण्यात आले. पण अचानक धानाची तोलाई थांबवल्यानंतर मंगळवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजता आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे धान पाण्यात सापडले. यामुळे शेतकऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला. अखेर मार्केटिंग व्यवस्थापकाला पाचारण करून शेवटी ४.३० वाजता तोलाई सुरू करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात १० ते १२ शेतकऱ्यांनी ३०० क्विंटल धान विक्रीसाठी आणून ठेवले होते. एका शेतकऱ्याच्या धान मोजणीवरून विनाकारण वाद घालून धान मोजणी थांबवण्यात आली व १० ते ११ शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. यातच अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा धान पाण्याखाली आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने शेवटी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तालुका खरेदी विक्री संस्थाध्यक्ष डॉ.झामसिंग बघेले, खंडविकास संचालक डेमेंद्र रहांगडाले यांच्यासह कर्मचारी उपस्थित झाले.
शेतकऱ्यांचा रोष अनावर होऊ नये म्हणून खरेदी विक्री संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरीत तोलाई सुरू करण्यास सांगितले.
पाण्याने ओला झालेला धान गोडावूनमध्ये टाकण्यास सांगितल्याने शेतकऱ्यांनी संभावीत नुकसानीपासून सुटकेचा श्वास सोडला. पण शेतकऱ्यांनी अशा पध्दतीने मोजमाप रोखणे चुकीचे असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आलेला धान त्वरीत मोजमाप करून चुकारे द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)