आणखी शेतकऱ्यांना मिळाले अटल सोलर कृषी पंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 12:13 AM2017-01-21T00:13:02+5:302017-01-21T00:13:02+5:30
उर्जा बचत आणि शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवित
गोंदिया : उर्जा बचत आणि शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या अटल सोलर कृषी पंप योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या २८ शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यात आले. वीज वितरण कंपनीने आणखी १३ अर्जदार शेतकऱ्यांचे वर्क आॅर्डर काढले असून १३ लाभार्थी शेतकऱ्यांचे काम सुरू आहे.
नियमित विद्युत पुरवठा किंवा विद्युत जोडणी नसल्यामुळे व भार नियमन असल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागत आहे. शिवाय औष्णिक पध्दतीच्या वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. त्यामुळे वायु प्रदूषणात भर पडत असून हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी आता ‘अटल सोलर कृषी पंप’ योजनेअंतर्गत सौर उर्जेचा वापर करण्याचे ठरविले व त्यातुनच सौर कृषीपंप योजना पुढे आली.
आॅगस्टपासून ही योजना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्याला १९५ कनेक्शनचे टार्गेट देण्यात आले आहे. एकंदर कृषीपंपाना सौर उर्जेतून वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी ताटकळत रहावे लागणार नाही. शिवाय वीज बिलाची थकबाकी असल्यास होणारी पंचाईत व वीज चोरीच्या प्रकारांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शिवाय वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारापासून शेतकरी मुक्त होऊन आपल्या शेतीला कधीही पाणी पुरवठा करू शकणार हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
जिल्ह्यात १११ लाभार्थी शेतकऱ्यांना डिमांड नोट देण्यात आली आहे. यातील ४७ लाभार्थ्यानी पैसे भरले असून २८ कामे पूर्ण झाली आहेत तर १३ शेतकऱ्यांचे विभागाने वर्क आॅर्डर काढले असून सध्या १३ शेतकऱ्यांचे काम सुरू आहे. म्हणजेच जिल्ह्यातील २८ शेतकऱ्यांकडील पंप सध्या सौर उर्जेवर चालत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. शिवाय लवकरात लवकर उर्वरीत अर्जदारांना त्यांचे कनेक्शन देण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)