अवैधरीत्या दारूची सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2017 12:41 AM2017-05-26T00:41:12+5:302017-05-26T00:41:12+5:30
स्थानिक बस स्थानकजवळील बिअर बारमधून सर्रास विदेशी दारूची विक्री सुरु आहे. यात ग्राहकांकडून दिडपट ते दुप्पट रक्कम वसूल करण्यात येत आहे.
स्टेट हायवेवरील बारमधून विक्री : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : स्थानिक बस स्थानकजवळील बिअर बारमधून सर्रास विदेशी दारूची विक्री सुरु आहे. यात ग्राहकांकडून दिडपट ते दुप्पट रक्कम वसूल करण्यात येत आहे. याकडे संबंधित अधिकारी लक्ष देतील काय? असा नागरिकांचा सवाल आहे.
लग्नसराईचे दिवस असल्याने व सगळीकडे दारूबंदी असल्याने या ठिकाणी आंबट शौकीन तसेच ग्राहकांची खूप गर्दी असते. दीडपट ते दुप्पट दर असूनही या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत आहे. एखाद्या चोखंदळ ग्राहकाने दराच्या बाबतीत विचारले असता ‘हमे गोंदिया से माल लाना पडता है और उपर तक पैसे भी भेजना पडता है, दारुवाले के हाथ बहोत लंबे होते है’ असे सांगून त्यांना गप्प केले जाते.
स्टेट हायवेवरील सर्व बार एक एप्रिलपासून बंद झाले असून सुद्धा तिरोडा शहरातील नवीन बस स्थानकाजवळील बार मात्र अजूनही चालूच असून ग्राहकांची लूट सुरू आहे. याबाबत गोंदिया जिल्हा आबकारी विभाग मात्र गाढ झोपेत आहे की झोपल्याचे सोंग घेत आहे, हेच कळत नाही. त्यामुळे कोर्टाच्या, शासनाच्या आदेशाची अवहेलना होत असून याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालावे, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
जिल्ह्यात शासनाच्या तसेच कोर्टाच्या आदेशाची अवहेलना होत असेल तर याकडे जिल्हाधिकारी गोंदिया यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. हा प्रशासनाचा भाग असून जनता, नागरिक लुबाडले जात आहेत. या गंभीर बाबीची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सगळीकडे दारूबंदी असल्याने मात्र लग्नात दारूशिवाय मजा नाही, अशी काहींची मानसिकता असल्याने आवश्यकतेपेक्षा जास्त दारू ढोसली जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे.