नायलॉन मांजाची सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 10:16 PM2018-01-11T22:16:30+5:302018-01-11T22:16:41+5:30
मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाण घेवाण करतो. मात्र ‘नायलॉन’ मांजामुळे अनेक कुटुंबीयांना हा दिवस कटू अन् काळ्या आठवणी देऊन गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाण घेवाण करतो. मात्र ‘नायलॉन’ मांजामुळे अनेक कुटुंबीयांना हा दिवस कटू अन् काळ्या आठवणी देऊन गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतर देखील ‘नायलॉन’ मांजाची गोंदियाच्या बाजारात विक्री सुरू असल्याचे चित्र आहे.
शहरातील बाजारपेठेत ‘नायलॉन’ मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. शहरात मोठ्या प्रमाणात हे मांजा खरेदी देखील करण्यात येत आहे. यात शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सुध्दा समावेश आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट शब्दांत निर्देश दिल्यानंतरही या जीवघेण्या मांजाचा उपयोग सुरू असणे हे प्रशासनाचे अपयशच मानण्यात येत आहे.‘नायलॉन’ मांजाने पतंग उडवून तसेच या मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाºया पतंगबाजांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यानंतरच त्यांच्यावर वचक बसेल. त्याकरिता प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी कारवाई करण्याची हिंमत दाखिवण्याची वेळ आली आहे, अशी मागणी जनतेद्वारे करण्यात येत आहे. ‘नायलॉन’ मांजाचा उपयोग करणाºया शाळकरी मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी देखील होत आहे.
बंदीनंतर देखील ‘नायलॉन’ मांजा उपलब्ध असणे, ही दुर्दैवी बाब आहे. पतंगबाजीत वर्चस्व दाखिवण्यासाठी या मांजाचा उपयोग करण्याकडे कल असतो.
मात्र असे करत असताना लोकांचा जीव आपण धोक्यात टाकत आहोत, याची जराशी जाणीव देखील यांना नसते. इतरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार यांना दिला तरी कुणी, असा संतप्त सवाल शहरवासीय उपस्थित केला जात आहे.
पोलिसांची बघ्याची भूमिका
पतंगबाजांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी पोलिसांवर देखील आहे. ‘बॉम्बे पोलीस अॅक्ट’मध्ये पतंगांबाबत कलम ११३, ११७ अंतर्गत तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. जर पतंग उडविण्यामुळे कोणाला शारीरिक इजा किंवा नुकसान होणार असेल तर कलम ११३ नुसार तो गुन्हा ठरतो व त्या व्यक्तीला कलम ११७ नुसार बाराशे रु पयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्याशिवाय यात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर यामुळे कोणी मरण पावला तर भादंविच्या कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होतो. परंतु पोलीस यंत्रणा जबाबदारी पार पाडत नसल्याचे नसल्याचे चित्र आहे.
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज
नायलॉन मांजाच्या धोका हा केवळ एका शहरापुरताच मर्यादित नाही. शहरांतील अनेक नागरिकांच्या जीवावर हा प्रकार बेतू शकतो. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने स्वत:हून यासंदर्भात ठोस पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधीनीसुध्दा यासाठी दखल घेण्याची गरज आहे.
दुचाकी चालकांनी घ्यावी काळजी
घराचे छत व मैदानावरचा ओ काटचा खेळ आता चक्क रस्त्यावर रंगू लागला आहे. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी वापरला जाणाºया मांजामुळे कुणाचा बळी जाईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे दुचाकी चालकांनी वाहने चालविताना स्वत:च काळजी घ्यावी.