सर्वाधिक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:39 AM2021-02-27T04:39:58+5:302021-02-27T04:39:58+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मागील तीनचार दिवसांपासून वाढत आहे. गोंदिया तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने हा तालुका ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मागील तीनचार दिवसांपासून वाढत आहे. गोंदिया तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने हा तालुका कोरोनाचा हॉटस्पाॅट होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात ११ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १ बाधिताने कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेले सर्व ११ रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६९,९३८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी ५८,१८१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ६८,४१६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी ६२,२१६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,४०० काेरोनाबाधित आढळले असून यापैकी १४,१०९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १०६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. तर, २२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
.......
जिल्हावासीयांनो दुर्लक्ष करू नका
लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तर, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करा, हात स्वच्छ धुवा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पालन करा.
........
लसीकरण मोहिमेकडे लक्ष
केंद्र शासनाने १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू केले जाईल, अशी घोषणा सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात शिक्षकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष कोरोना लसीकरण मोहीम केव्हा सुरू होते, याकडे लागले आहे.
.........
लसीकरणासंदर्भात सूचना नाहीत
केंद्र सरकारने जरी १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जाईल, असे सांगितले जात असले तरी यासंदर्भातील कुठल्याच सूचना आरोग्य विभागाला मिळालेल्या नाही. तसेच ६० वर्षांवरील किती व्यक्ती आहेत, त्यांची यादीसुद्धा जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आली नाही. त्यामुळे नियोजन करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
......
सात हजार लसी उपलब्ध
सध्या जिल्हा आरोग्य विभागाकडे सात हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. पुन्हा लसींची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे. पण, अद्याप नवीन साठा उपलब्ध झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.