सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार

By admin | Published: May 28, 2016 01:47 AM2016-05-28T01:47:33+5:302016-05-28T01:47:33+5:30

स्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते.

Most women suffer from bleeding | सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार

सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार

Next

आरोग्य महिलांचे : सहा वर्षात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर जिल्ह्यात ९८ महिलांचा मृत्यू
देवानंद शहारे गोंदिया
स्त्री व पुरूष यांच्या शरीररचनेसह विचार करण्याच्या पद्धतीत निसर्गानेच फरक केला आहे. मासिक पाळीमुळे दर महिन्यात महिलांच्या रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते. शिवाय गरोदर स्त्रीला तर रक्ताची जास्तच गरज असते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांना रक्तक्षयाचा आजार भेडसावत आहे. यातूनच प्रसुतीपूर्वी किंवा प्रसुतीनंतर प्रकृती खालावून महिला दगावत आहेत. अलिकडे हे प्रमाण कमी होत असले तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही.
कुपोषित बाळ जन्माला येवू नये यासाठी स्त्रियांनाच मोठी काळजी घ्यावी लागते. सर्वप्रथम शरीर, मनाने विकसित झाल्याशिवाय व शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्याशिवाय स्त्रियांनी लग्न करू नये. वयोमानानुसार १८ वर्षांपूर्वी तर मुलीने लग्न करूच नये, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. त्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते. तरीही आदिवासीबहुल आणि भटक्या जमातीत लवकर लग्न करण्याची पद्धत रूढ आहे.
लग्नानंतर पहिली मासिक पाळी चुकते तेव्हा वैद्यकीय सल्ला व तपासण्या करून घेणे आवश्यक असते. शरीरास आवश्यक असलेले अन्नघटक आपल्या आहारातून मिळतात किंवा नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. असे अन्नघटक किंवा जीवनसत्वे आहारात मिळत नसतील तर योग्य अन्नघटकांचा वापर आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. परंतू ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती आणि जागृतीचा अभाव यामुळे महिला सकस आराहाच्या बाबतीत गंभीर दिसत नाहीत.
महिलेच्या शरीरात रक्ताची (हिमोग्लोबिन) कमतरता असेल तर होणारे बाळ कुपोषित होण्याची शक्यता असते. सुरूवातीला बाळात अशी लक्षणे आढळत नसली तरी भविष्यात ती दिसू लागतात. मातेच्या रक्तातूनच तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळास पोषक आहार मिळतो व बाळ सुदृढ होते. जर मातेलाच रक्ताची कमतरता असेल तर होणारे बाळ कमजोर राहते किंवा त्याचा एखादा भाग कमकुवत असण्याची शक्यता असते. त्यामुळे होणाऱ्या बाळासाठी आईचा आहार सर्वकाही असते. अलिकडे अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातून गरोदर महिलांच्या सकस आहारापासून तर औषधोपचारापर्यंतची काळजी घेतली जात असतानाही काही महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण आढळते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांरी कितपत इमानदारीने कर्तव्य करतात यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महिलांनी प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर नियमित वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे. यात ब्लड प्रेशर, गर्भाचा घेर, रक्ताचे प्रमाण, आईचे वजन आदी तपासण्या प्रामुख्याने करणे गरजेचे असते. यातून होणारे बाळ सशक्त आहे किंवा नाही हे समजते. आईचे वजन वाढत असेल व रक्ताचे प्रमाणही योग्य असेल तर होणारे बाळ सुदृढ असते. अन्यथा मातामृत्यू व अर्भक मृत्यूचा धोका असतो. मागील सहा वर्षांत जिल्ह्यात प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर एकूण ९८ मातामृत्यू झाल्या आहेत.

महिलांना उद्भवणारे आजार
गोंदिया जिल्ह्यातील महिलांमध्ये आढळणाऱ्या आजारात सर्वप्रथम रक्तक्षयाचा क्रमांक आहे. शरीरात रक्ताची कमतरता असणे, त्यामुळे नंतर रक्तदाबाचा (बी.पी) आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे गर्भाला विषबाधा होणे. यात आईच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. मात्र ही बाधा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्र आता निघाले आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात प्रसूतीपूर्व दोन व प्रसूतीनंतर सहा अशा एकूण आठ मातामृत्यू झाल्या. मात्र प्रसूतीदरम्यान एकाही मातेचा मृत्यू झाला नाही.

पीएएनए कार्यक्रम
कोणत्याही महिलेमध्ये रक्ताचे प्रमाण व्यवस्थित राहात नाही. दर महिन्यात हे प्रमाण कमी-जास्त होते. गरोदर महिलांनी आपल्या आहारविहाराचे वेळापत्रक तयार करून पोषक तत्वांचा त्यात समावेश करावा. शिवाय शासनातर्फे पीएएनए (प्रोफीलॅक्सीक अगेन्स्ट न्युट्रीशनल एनिमिया) हा कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार रक्ताची कमतरता असलेल्या महिलेसाठी १०० गोळ्या दिल्या जातात. दररोज एक गोळी याप्रमाणे सेवन करावी लागते. तसेच गरोदर महिलांनी शासनाच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा. त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन व औषधोपचार केला जातो.

Web Title: Most women suffer from bleeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.