भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, ५०० मीटर नेले फरफटत; दोन मुलांसह आईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 10:22 AM2022-05-06T10:22:31+5:302022-05-06T10:51:36+5:30
अपघात झाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
सडक अर्जुनी (गोंदिया) : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तीन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नैनपूर गावाजवळ गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रीती तुळशीराम मेश्राम (३४), चिन्मय तुळशीराम मेश्राम (६) व बारा वर्षांचा मुलगा असे तीन जण घटनास्थळीच ठार झाले. तर, शिक्षक तुळशीराम मेश्राम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
लाखांदूर तालुक्यातील धरतोडा शिक्षक तुळशीराम मेश्राम हे पत्नी आणि आपल्या दोन मुलांसह दुचाकीने देवरीकडे जात होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गावकऱ्यांनी १०८ क्रमांकाचे वाहन बोलावून गंभीर जखमी असलेले तुळशीराम मेश्राम यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना केले. तुळशीराम मेश्राम हे देवरी तालुक्यातील देऊळगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पत्नीसह दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने मेश्राम कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पाचशे मीटर फरफटत गेली दुचाकी
भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेली धडक एवढी जोरदार होती की, घटनास्थळापासून दुचाकी जवळपास पाचशे मीटर फरफटत गेली. नैनपूरजवळ झालेल्या अपघातात ठार झालेले शिक्षकाचे कुटुंबीय असल्याचे कळताच शिक्षकांच्या विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर हा मॅसेज पोहोचताच देवरी आणि सडक अर्जुनी येथील शिक्षकांनी घटनास्थळी पोहोचत मदतकार्याला सुरुवात केली. तसेच या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.