आईला भेटण्याआधीच ती जग सोडून गेली, कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू : एक गंभीर जखमी
By नरेश रहिले | Published: June 27, 2023 07:57 PM2023-06-27T19:57:04+5:302023-06-27T19:57:13+5:30
अनिताची दोन मुले झाली आईच्या प्रेमाला पोरकी
आमगाव : आईच्या पदराखाली येण्याच्या आधीच मुलीला जग सोडावे लागले. ही दुर्देवी घटना २६ जूनच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पोवारीटोला (पदमपूर) येथे घडली. २६ जून रोजी सायंकाळपासून गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. त्या पावसाच्या लगबगीत लिफ्ट घेऊन आईला भेटण्यासाठी जाणाऱ्या मुलीला मागून येणाऱ्या कारने चिरडले. यात त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. अनिता राजू वरमाडे (३२, रा. रामाटोला अंजोरा) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
ती पुण्यावरून २६ जूनच्या सायंकाळी आमगावच्या आंबेडकर चौकात आली; परंतु, पावसामुळे गावाला जाण्यासाठी बस किंवा खासगी वाहन नसल्यामुळे तिने गावाला जाणाऱ्या दुचाकी चालकाला आपण सोबत येत असल्याची विनंती केली. त्याने तिला आपल्या दुचाकी (एमएच ३५ एटी १३४०) या वाहनावर बसवून पावसातच जात असताना आमगावकडून देवरीकडे धावणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात अनिताचा जागीच मृत्यू झाला. कारने दुचाकीला धडक दिल्यावर अनिता २५ फूट लांब फेकली गेली. तर नागेश उईके (३०, रा. माडीटोला, अंजोरा) हा गंभीर जखमी झाला.
ते दोघेही दुचाकीने आमगाववरून गावाकडे जात असताना त्यांची दुचाकी (एमएच ३५ एटी १३४०) या वाहनाला चारचाकी वाहन (एमएच ३५ पी ६९६०) या वाहनाने मागून मोटरसायकलला धडक दिली. या अपघातानंतर चारचाकी वाहनचालक हा अपघातस्थळावरून वाहन तिथेच सोडून प्रसार झाला. अनिताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे करण्यात आले. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
अनिताची दोन मुले झाली आईच्या प्रेमाला पोरकी
कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत अनिताचा मृत्यू झाला. अनिताला दोन मुले असून तिचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुले आता आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे वरमाडे यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.