आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:11+5:302021-07-18T04:21:11+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा १५ जुलैपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात वर्ग ८ ते १२ ...
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा १५ जुलैपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात वर्ग ८ ते १२ वीच्या ३६९ शाळांपैकी १८१ शाळांच्या समित्यांनी शाळा सुरू करण्याचा ठराव शिक्षण विभागाला दिला आहे. त्यातील १५३ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. शाळा समित्यांनी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला असला तरी पाल्यांना शाळेत पाठविण्याचे समंतीपत्र पालकांनी देणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील २७४६६ विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी १०७२४ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र दिले आहे. यापैकी ९३६३ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले आहेत. मुलांना शाळेत पालक पाठवित असले तरी आईला आपल्या मुलांची खूप काळज़ी वाटत आहेे.
................................
काळजी आहे, पण शिक्षणही महत्त्वाचे
१) कोरोनामुळे दोन वर्षे लेकरांचे वाया जात आहेत. मुलांच्या शिक्षणाचे खूप मोठे नुकसान होत आहे. मुलांना शाळेत पाठविले तर कोरोना होणार नाही, याची चिंता सतावत आहे.
- माया शिवणकर, आमगाव.
२) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता शाळा सुरू होणे महत्त्वाचे आहे. मुले घरात राहून कंटाळले आहेत; परंतु मुलांना शाळेत पाठविताना कोरोनाची भीती वाटत आहे.
तेजस्वीनी खोटेले, डोंगरगाव.
३) मुलांना शाळेत पाठविताना कोरोनाची भीती वाटत आहे; परंतु शिक्षणाचे नुकसान होणे म्हणजे मुलांच्या आयुष्याचे नुकसान होण्यासारखे आहे. यासाठी काळजी घेत मुलांना शाळेत पाठवित आहोत.
अर्चना चिंचाळकर, आमगाव.
..........
शाळेतून घरी परतल्यास आंघोळ करा व कपडे बदला
मुलांनो, आपण शाळेतून घरी परतलात तर आधी आंघोळ करा व नंतरच घरात प्रवेश करा. शक्य तेवढ्या कमी पुस्तके शाळेत न्या. शाळेतून परत आल्यावर पुस्तकांवर सॅनिटाईजरची फवारणी करा किंवा दप्तर उन्हात ठेवा. शाळेतून घरी आल्यावर घरात आंघोळ केल्याशिवाय प्रवेश करू नका.
.................
अ) वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा
ब) शारीरिक अंतर ठेवा व बाेलणे दुरूनच ठेवा.
क) तोंड व नाकावरील मास्क काढू नका, तसेच मास्कला वारंवार हात लावू नका.
ड) शाळेतून घरी परतल्यावर अंगावरील कपडे धुवायला टाका.
..................
जिल्ह्यातील ८ ते १२ च्या एकूण शाळा -३६९
सुरू झालेल्या शाळा- १५३
अद्याप बंद असलेल्या शाळा- २१६