आईचे पहिले चिकदूध बाळासाठी अमृतासमान असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:13+5:302021-08-14T04:34:13+5:30
केशोरी : जन्म झालेल्या बाळासाठी आईचे पहिले चिकदूध अमृतासमान असून बाळाला जीवनसत्त्वे, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा पोषक ...
केशोरी : जन्म झालेल्या बाळासाठी आईचे पहिले चिकदूध अमृतासमान असून बाळाला जीवनसत्त्वे, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी केले.
जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चिचोली, परसटोला, वडेगाव (बंध्या) या उपक्रेंद्रातील बाळंतीच्या शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पिंकू मंडल म्हणाले, नियमित स्तनपान करणे हे आई व बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असून बाळ जन्मत:च सर्वप्रथम बाळाला आईचे पहिले चिकदूध पाजावे, ते अमृतासारखे असते. ते बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यांची तुलना कशाशीही केली जाऊ शकत नाही. मातेच्या स्तनपानाद्वारे मिळणाऱ्या दुधात उत्तम पोषणमूल्ये असतात. नवजात बाळासाठी अन्य कोणत्याच बाहेरील दुधातून मिळू शकत नाही. स्तनपानामुळे बाळाची वाढ झपाट्याने होते. रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस वाढत जाते. बाहेरील वातावरणामधून जंतू संसर्गापासून बचाव होत असतो. चिकदुधामुळे बाळाला अस्थमा किंवा दमा होण्याची शक्यता राहत नाही. बाळाच्या मेंदूचा विकास झपाट्याने होत असल्याचे डॉ. मंडल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षिका हाडगे यांनी केले तर आभार हिना वावरे यांनी मानले.