बकी गेट ठरतोय पर्यटकांसाठी पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 08:46 PM2019-05-12T20:46:05+5:302019-05-12T20:46:31+5:30
तालुक्यातील नवेगावबांध - नागझिरा अभयारण्यातंर्गत येणारा बकी गेट सध्या पर्यटकांनासाठी पर्वणी ठरत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे पर्यटकांना सहज दर्शन होत असल्याने बकी गेट पर्यटकांना आर्कषित करीत आहे. मागील काही वर्षांपासून नवेगाव- नागझिरा अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : तालुक्यातील नवेगावबांध - नागझिरा अभयारण्यातंर्गत येणारा बकी गेट सध्या पर्यटकांनासाठी पर्वणी ठरत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे पर्यटकांना सहज दर्शन होत असल्याने बकी गेट पर्यटकांना आर्कषित करीत आहे.
मागील काही वर्षांपासून नवेगाव- नागझिरा अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुध्दा दिवसेंदिवस वाढत असून रोजगार निर्मितीला वाव मिळत आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, हरिण, सांभर, चितळ, नीलगाय, ससे, अस्वल, नीलघोडा, रानडुक्कर, मोर, लावा, तीतर, लांढोर, गुंधुर लावा, नीलकंठ, रानकुत्रे आदी वन्यप्राण्यांचे सहज दर्शन होते. बकी गेटने पर्यटन केल्यास हमखास वन्य प्राण्यांचे दर्शन होते.
त्यामुळे पर्यटकांचा कल सुध्दा या गेटकडून जाण्यात अधिक असल्याचे दिसून येत आहे. या गेटवरून पुढे गेल्यास थातेमारी, गो, जांबुडझरी, झलकारगोंदी तलाव, टी के जाईन, रांजीतोक, बोद्राई, अगेझरी, कमकाझारी, कालीमाती गवत कुरण, बदबदा झरी या परिसरात वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी दुपारच्या वेळी येतात.
बकी गेट ने जाण्यासाठी खडीकरणाचा पक्का रास्ता आहे . बकी गेट हा राष्ट्रीय महामार्ग कोहमारा गावापासून तीन कि.मीे.अंतरावर आहे. या गेट मधून रायपूर , देवरी, गोंदिया, गोरेगाव , सडक अर्जुनी, नागपूर, भंडारा साकोली, मार्गे येणाºया पर्यटकांना फारच सोयीचे आहे. सद्या गाईड नसल्यामुळे शासनाचे हंगामी मजूर पर्यटकांना सोबत पाठवित आहे. यासाठी पर्यटकांना वेगळे शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे येथे येणाºया पर्यटकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे.