महागाई विरोधात भाकपचे आंदोलन
By admin | Published: August 20, 2016 12:56 AM2016-08-20T00:56:46+5:302016-08-20T00:56:46+5:30
भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय आव्हानाप्रमाणे वाढती महागाई, नऊ क्षेत्रात एफडीआयच्या विरोधात तसेच दुष्काळी व पूरग्रस्त....
भरपाईची मागणी : निदर्शने करून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय आव्हानाप्रमाणे वाढती महागाई, नऊ क्षेत्रात एफडीआयच्या विरोधात तसेच दुष्काळी व पूरग्रस्त विभागात सोयी-सवलती व पीक नुकसानीची भरपाई करण्याच्या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करुन पंतप्रधानाच्या नावाने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत असून जिवनोपयोगी वस्तुंच्या महागाईने सर्वच त्रस्त झाले आहे. सरकारने संवेदनशील सुरक्षा खात्यापासून औषध पर्यंत नऊ खात्यात प्रत्यक्ष परवानगी दिल्याने देशातील उद्योगधंदे, कृषी व वैद्यकीय क्षेत्राला मोठा तोटा होण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. यामुळे बेकारी वाढणार व देशातील भांडवल विदेशात जाणार आहे. वाढत्या महागाईने अन्नधान्य, भाजीपाला इत्यादींची भाववाढ तर होतच आहे. एवढेच नाही तर शिक्षणसामुग्री, प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पेन, पेन्सील कॉपी स्टेशनरी सारख्या मौलिक वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत.
या विरोधात निदर्शनाच्या माध्यमाने सर्वसामान्य जनतेच्या जिवनोपयोगी वस्तंूच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन देऊन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.
शिष्टमंडळात राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, जिल्हा सचिव मिलींद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, परेश दुरुगवार आदी प्रामुख्याने हजर होते. (शहर प्रतिनिधी)