धान खरेदी केंद्र त्वरित सुरु न झाल्यास आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:08+5:302021-05-19T04:30:08+5:30

गोंदिया : खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करुन रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरित सुरु ...

Movement if paddy procurement center is not started immediately () | धान खरेदी केंद्र त्वरित सुरु न झाल्यास आंदोलन ()

धान खरेदी केंद्र त्वरित सुरु न झाल्यास आंदोलन ()

Next

गोंदिया : खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करुन रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा माजी मंत्री राजकुमार बडोले यांंच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी रब्बी धान पिकांची मोठ्या प्रमाणात लावगड केली जाते. या धान पिकाच्या विक्रीतून रब्बी पिकाचे नियोजन व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न शेतकरी करतो. मात्र सहकारी खरेदी विक्री केंद्रांवरुन खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल झालेली नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळ अधिनस्त सहकारी संस्था व मार्केटिंग फेडरेशन अधिनस्त सहकारी संस्थांच्या गोदामामध्ये जुने धान पडून आहे. अशा स्थितीत आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनने रब्बी धान खरेदी केले नाहीत तर शेतकऱ्यांना आपले धान हजार-बाराशे रुपयांपर्यंत पडक्या किमतीत खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागेल स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात ही कोरोना संसर्ग वाढलेला आहे. टाळेबंदीमुळे शेतकरी, शेतमजुरांच्या रोजगारावर ही मर्यादा आलेल्या आहेत, अनेकांचे रोजगारही बंद झाले आहे. पावसाळा सुरू व्हायला पंधरा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शासनाने २१ मे पर्यंत खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करुन रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. शिष्टमंडळात भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, आ. विजय रहांगडाले, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. गोपालदास अग्रवाल, भंडारा-गोंदिया संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर यांचा समावेश होता.

.........

प्रोत्साहन अनुदान, बोनस, गोदामांवर ही चर्चा

शेतकऱ्यांना कर्जाच्या रक्कमेची दरवर्षी पूर्ण परतफेड केल्यावर देण्यात येणारे ५० हजार प्रोत्साहन अनुदान अद्याप देण्यात आले नाही. धानाला प्रति क्विंटल दिला जाणारा सातशे रुपये बोनस त्वरित देण्यात यावा, अशी मागणी ही करण्यात आली. यावेळी चर्चेदरम्यान, शासनाकडे धान साठवणुकीसाठी आजघडीला गोदाम रिकामे नाहीत. त्यामुळे प्रशासनाने राईस मिलर्स व सहकारी संंस्थांशी संयुक्तरीत्या चर्चा करुन सहकारी संस्थांच्या मार्फत राईस मिलमध्येच धानाची खरेदी सुरु करावी. त्यामुळे साठवणुकीची समस्या सोडविली जाईल अशी सूचना सुद्धा यावेळी करण्यात आली.

.......

कोविड रुग्णांच्या उपचाराचा खर्च परत करा

शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील नागरिकांना कोविड उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचाराचा खर्च देण्यात येतो. या योजनेच्या संदर्भात नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्वरित अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयात उपचार घेतलेल्या कोरोना रुग्णांना या योजनेचा लाभ देऊन उपचाराचा खर्च परत करुन दिलासा देण्यात यावा, अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Movement if paddy procurement center is not started immediately ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.