रेल्वे प्रवाशांची तिकिटांसाठी पळापळ
By admin | Published: March 31, 2017 01:19 AM2017-03-31T01:19:44+5:302017-03-31T01:19:44+5:30
गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्गवरील बाराभाटी या स्थानकावरून दर दिवशी शेकडो लोक रेल्वे प्रवास करतात.
तिकिटांचा तुटवडा : दोन महिन्यांपासून बम्हपुरीचे तिकीट नाही
बाराभाटी : गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्गवरील बाराभाटी या स्थानकावरून दर दिवशी शेकडो लोक रेल्वे प्रवास करतात. परंतु या स्टेशनवर गेल्या दोन महिन्यांपासून ब्रम्हपुरी या स्थानकाचे तिकीटच मिळत नाही. हे तिकीट हवे असेल तर पायपीट करीत नवेगावबांधला जावे लागत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया-चांदाफोर्ट या रेल्वे रस्त्यावर बाराभाटी स्टेशन आहे. या स्टेशनवर अनेक समस्या आहेत. यात आता प्रवाशांना तिकीट न मिळणे ही एक समस्या उभी झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून प्रवासी ब्रम्हपुरीच्या तिकीटापासून वंचित आहेत. येथे खासगी केंद्राकडून तिकीट विक्री होते. हे विक्रेते नवेगावबांध रेल्वे स्टेशनमधून तिकीट आणतात. मात्र दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाचे नवेगावबांध येथील कर्मचारी येथील तिकीट विक्रेत्याला ब्रम्हपुरीचे तिकीट विक्रीकरिता देत नाही असे येथील तिकीट विक्रेता प्रवाशांना सांगतो व समोरील तिकीट देऊन प्रवास करा, असे सांगतो.
यामध्ये प्रवाशांचे जास्त पैसे खर्च होत असून त्यात डोकेदुखी अधीकची आहे. बम्हपूरी ला जाण्यासाठी आता प्रवाशाना नवेगावबांध ला जाणे व तेथून तिकीट घेऊन नंतर प्रवास करणे म्हणजे चांगलीच कसरत होत आहे. रेल्वे विभागाचा असा हा भोंगळ कारभार येथे प्रवासी रोज अनुभवत आहेत; मात्र रेल्वे विभाग व तिकीट विक्रेत्याचे डोळे अजून उघडले नाही. (वार्ताहर)
आम्ही नवेगावबांध येथून तिकीट आणतो. तिकिटे संपली तेव्हा इंडेन प्रपत्र भरुन पाठविले आहे. तिकीट निरीक्षक गोंदिया यांच्याशी बोलणे झाले. गोंदिया कार्यालयातून तिकिटे मिळताच ती उपलब्ध होतील. पण दोन महिन्यांंपासून ब्रम्हपुरी स्टेशनचे तिकीट उपलब्ध नाही.
- राजेश पाऊलझगडे
रेल्वे तिकीट विक्रेता, बाराभाटी