समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 09:50 PM2018-06-11T21:50:04+5:302018-06-11T21:50:04+5:30
समाज कल्याण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनस्तरावरून दखल घेतली जात नसल्यामुळे त्याचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनेने ११ व १२ जून रोजी रोजी काळ्याफित लावून कामकाज करणे व दुपारच्या सुट्टीत शासनाविरूद्ध निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : समाज कल्याण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनस्तरावरून दखल घेतली जात नसल्यामुळे त्याचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनेने ११ व १२ जून रोजी रोजी काळ्याफित लावून कामकाज करणे व दुपारच्या सुट्टीत शासनाविरूद्ध निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपर्यंत (दि.१२) शासन स्तरावरून प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास बुधवारपासून (दि.१३) बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची नियमित पदोन्नती करणे, ५० टक्यांपेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरणे, नव्याने कार्यान्वित योजनांसाठी अधिकची पदे निर्माण करणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी आकृतिबंध निर्माण करणे, नवीन शासकीय वसतिगृहांसाठी पदे मंजूर करणे, अंतिम कारवाईचे अधिकार नसतांनाही कर्मचाऱ्यांचे केलेले निलंबन मागे घेणे, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीतून वेतन अदा करणे, मानधनावरील कर्मचा-यांना कायम करणे, वैद्यकीय देयकांचे प्रतिपूर्तीच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करणे, आदी मागण्या समाज कल्याण कर्मचारी संघटनेने शासनाकडे वारंवार केल्या आहेत.
याची दखल शासन स्तरावरु न घेतली न गेल्याने त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले जात असून सोमवारपासून (दि.११) राज्यभरातून समाज कल्याण कर्मचाºयांनी काळ्याफित लावून कामकाज करण्यास सुरूवात केली आहे. आंदोलनात नागपूर विभागीय कोषाध्यक्ष योगेश कढव, गोंदिया जिल्हाध्यक्ष सतीश वाघ , सदस्य कुंदन कोळवते, प्रभाकर निकोडे, अंकेश केदार , अनिल बोढे, विनायक जटाळे, मनोहर सोनटक्के, विलास रामटेके आदी सहभागी आहेत.