कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:00 AM2021-03-20T05:00:00+5:302021-03-20T05:00:25+5:30
जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतपत आलेली बाधितांची संख्या पुन्हा ३२८ पर्यंत पोहोचली आहे. त्यात दररोज बाधितांची संख्या वेगाने वाढत असून, हीच स्थिती राहिल्यास मागीलवर्षीप्रमाणे रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी जागेची कमतरता भासणार, यात शंका वाटत नाही. सध्या जिल्ह्यातील २४९ रुग्ण घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मात्र हा प्रकारही धोक्याचाच असून, अशा रुग्णांपासूनही कोरोनाचा प्रसार होणार, यात शंका नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात वेगाने होत असलेली कोरोनाबाधितांची वाढ बघता आता आरोग्य विभाग कामाला लागले आहे. बाधितांची वाढती संख्या बघता आता आरोग्य विभागाकडून ४ तालुक्यांत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. यामध्ये गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतपत आलेली बाधितांची संख्या पुन्हा ३२८ पर्यंत पोहोचली आहे. त्यात दररोज बाधितांची संख्या वेगाने वाढत असून, हीच स्थिती राहिल्यास मागीलवर्षीप्रमाणे रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी जागेची कमतरता भासणार, यात शंका वाटत नाही. सध्या जिल्ह्यातील २४९ रुग्ण घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मात्र हा प्रकारही धोक्याचाच असून, अशा रुग्णांपासूनही कोरोनाचा प्रसार होणार, यात शंका नाही. अशात या सक्रिय रुग्णांची वेगळीच व्यवस्था करणे आहे. हीच बाब हेरून आरोग्य विभाग आतापासूनच यावर तोडगा म्हणून कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तयारीला लागले आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यात गोंदिया तालुक्यातील जिल्हा क्रीडा संकुल, सालेकसा येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, देवरी येथील शासकीय निवासस्थान, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथील जिल्हा परिषद शाळेचे कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहण केले जाणार आहे.
सोमवारपासून पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू होणार
मागीलवर्षी कोरोनाचा उद्रेक वाढला असता, येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. सौम्य लक्षण असलेल्या बाधित रुग्णांची व्यवस्था येथे करण्यात आली होती. त्यामुळे बाधितांच्या व्यवस्थेला घेऊन एक मोठी समस्या या कॉलेजमुळे सुटली होती. आता पुन्हा कोरोनाचा धोका बघता आरोग्य विभागाने पुन्हा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटरसाठी तयारी सुरू केली असून, सोमवारपासून (दि.२२) हे सेंटर सुरू होणार असल्याची माहिती आहे.
नियम पाळा व लस घ्या
कोरोनाचा वाढता धोका बघता नागरिकांनी कोरोनावियषक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर, शारीरिक अंतराचे पालन, गर्दीत जाणे टाळणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. याशिवाय, कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी लसीकरण करवून घेण्याची गरज आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी कळविले आहे.